Saturday, September 06, 2025 01:06:09 PM

RDX Mumbai Bomb Threat : मुंबई बॉम्बस्फोट धमकीप्रकरणातील आरोपी अटकेत, 400 किलो RDX लपवण्याचा रचला कट

ऐन अंनत चतुर्दशीच्या दिवशी बॉम्बस्फोटाच्या धमकीने मुंबई हादरली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर एका अज्ञात व्यक्तीने मेसेज पाठवला होता.

rdx mumbai bomb threat  मुंबई बॉम्बस्फोट धमकीप्रकरणातील आरोपी अटकेत 400 किलो rdx लपवण्याचा रचला कट

मुंबई: अंनत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर आज सर्व गणेशभक्त त्यांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे विर्सजन करणार आहेत. त्यामुळे, मुंबईतील गिरगाव चौपाटीवर मोठी तयारी करण्यात आली आहे. तसेच, मुंबईतील प्रसिद्ध गणेशमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी आणि विशेषत: गणेश विसर्जनासाठी लालबाग- परळ, गिरगाव आणि दक्षिण मुंबईतील मुख्य रस्त्यांवर भाविकांची गर्दी असते. त्यामुळे, सुरक्षा कारणात्सव पोलीस मोठ्या संख्येने याठिकाणी उपस्थित असतात. 

मात्र, ऐन अंनत चतुर्दशीच्या दिवशी बॉम्बस्फोटाच्या धमकीने मुंबई हादरली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर एका अज्ञात व्यक्तीने मेसेज पाठवला होता. '14 पाकिस्तानी दहशतवादी मुंबईत पोहोचले आहेत. यासह, 34 गाड्यांमध्ये 400 किलो आरडीएक्स लपवण्यात आले आहेत. या स्फोटांमुळे सुमारे 1 कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो', असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला होता. धमकीच्या मेसेजमध्ये 'लष्कर-ए-जिहादी' नावाच्या कथित दहशतवादी संघटनेचा उल्लेख होता.

धमकीचा मेसेज मिळाल्यानंतर, क्षणाचाही विलंब न करता मुंबई पोलिसांनी नोएडा पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर, नोएडा पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. अखेर, नोएडा पोलिसांनी धमकीचा मेसेज देणाऱ्या आरोपीला अटक केली. या आरोपीचे नाव अश्विनी असल्याचे समोर आले आहे. आरोपी अश्विनी बिहारचा रहिवासी आहे. मागील 5 वर्षांपासून आरोपी अश्विनी नोएडा येथे राहत होता. आरोपी अश्विनीला नोएडा पोलिसांनी अटक करून मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. यादरम्यान, मुंबई पोलिसांनी आरोपी अश्विनीचा मोबाईल जप्त केला आहे. तसेच, मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. 

हेही वाचा: Pune Ganpati Visarjan Miravnuk 2025 : ढोलताशाच्या गजरात पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरूवात; पालखीत बाप्पा विराजमान

योगेश कदम काय म्हणाले?

'काल हा मेसेज आला होता. परंतु, यात कुठेही घाबरून जायचं कारण नाही. मुंबई पोलिस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. हा मेसेज कुठून आला आहे? याची माहिती सध्या मुंबई पोलिस घेत आहेत. त्यामुळे, निश्चित राहा, तुम्ही सुरक्षित आहात. मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारची दहशतवादी घटना घडणार नाही, यासाठी मुंबई पोलिस सतर्क आहेत. त्यामुळे, घाबरून जायचं कारण नाही', अशी प्रतिक्रिया मंत्री योगेश कदम यांनी दिली आहे.


सम्बन्धित सामग्री