Sunday, August 31, 2025 11:17:01 AM

अवकाळी पावसाने बळीराजाला पुन्हा रडवलं; नाशिक, धुळ्यासह संभाजीनगरमध्ये पावसाची हजेरी

राज्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावत शेतकऱ्यांच्या संकटात भर घातली आहे. मार्च-एप्रिलच्या मोसमात काढणीच्या तयारीत असलेल्या पिकांवर वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट

अवकाळी पावसाने बळीराजाला पुन्हा रडवलं नाशिक धुळ्यासह संभाजीनगरमध्ये पावसाची हजेरी

मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावत शेतकऱ्यांच्या संकटात भर घातली आहे. मार्च-एप्रिलच्या मोसमात काढणीच्या तयारीत असलेल्या पिकांवर वादळी वाऱ्यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. कांदा, मका, गहू, हरभरा, ज्वारी, हळद, आंबा यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा एकदा मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. नाशिक, धुळे, संभाजीनगर, लातूर, सांगली, हिंगोली आणि बुलढाणा अशा अनेक जिल्ह्यांत शेती उद्ध्वस्त झाली असून प्रशासनाकडून पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यभरातील नुकसानीचा आढावा:

बुलढाणा – जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार अवकाळी पावसाने आठ तालुक्यांतील 4,182 हेक्टर शेती क्षेत्रात मका, ज्वारी, कांदा व फळबागांचे नुकसान केले आहे. खामगाव व नांदुरा तालुक्यांतील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून तातडीने पंचनाम्यांचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

संभाजीनगर – पैठण, गंगापूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, सिल्लोड व फुलंब्री तालुक्यांत अचानक पावसाने हजेरी लावत मका, गहू, हरभरा व कांदा पिकांचे नुकसान केले आहे.

नाशिक – गेल्या दोन दिवसांत 30 गावांतील 1,990 शेतकऱ्यांचे पीक जमीनदोस्त झाले असून 1,298 हेक्टर क्षेत्र बाधित आहे. सर्वाधिक 1,175 हेक्टरवरील कांद्याचे नुकसान झाल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद आहे.

लातूर – जिल्ह्यात गहू, ज्वारी यांसारखी काढणीला आलेली पीकं मोठ्या प्रमाणात पावसामुळे नष्ट झाली आहेत. अनेक भागांत गारा पडल्यामुळे नुकसानीत वाढ झाली आहे.

धुळे – जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह गारपिटीने 3,075 हेक्टर क्षेत्रातील पिके बाधित झाली आहेत. यामध्ये कांदा, मका, बाजरी, पपई, आंबा, शेवगा, ज्वारी, गहू यांचा समावेश आहे. धुळे तालुक्यात 1,971 शिंदखेडा तालुक्यात 965,साक्रीत 72 आणि शिरपूरमध्ये 55 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे.

हिंगोली – वसमत व कळमनुरी भागात वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसामुळे शिजवलेली हळद, काढणीला आलेला कांदा व आंब्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे अनेक भागात वीजपुरवठाही खंडित झाला.

सांगली – जत व वाळवा तालुक्यात वारणा पट्ट्यात वादळी वाऱ्यांसह पावसाने धडक दिली. भुईमूग, गहू, हरभरा व शाळू पिकांवर परिणाम झाला असून मळणी व काढणीचे काम रखडले आहे.

हेही वाचा: फुकट्यांकडून रेल्वेला मालामाल लॉटरी; वर्षभरात पावणेपाच लाख फुकटे प्रवासी गजाआड

राज्यभरात शेतकऱ्यांवर ओढावलेल्या या नैसर्गिक संकटामुळे बळीराजा पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. शासनाने सर्व बाधित भागात तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


सम्बन्धित सामग्री