बारामती: तालुक्यातील झारगडवाडी येथील महिलांनी जागतिक महिला दिनी (8 मार्च) न्याय मिळावा यासाठी बारामती प्रशासकीय भवनासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्धार केला आहे. गेल्या 60 वर्षांपासूनच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यावर अडथळा आणल्याने महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
गट नंबर 460 मधील रहिवाशांसाठी जिल्हा परिषदेमार्फत रा. मा. 120 ते धुळदेव माणिक बोरकर हा रस्ता मंजूर करण्यात आला होता. मात्र, बारामती तालुका युवक अध्यक्ष प्रशांत बोरकर यांनी राजकीय द्वेषातून हा रस्ता अडवल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे येथे राहणाऱ्या वयोवृद्ध महिला, पुरुष, शाळकरी मुलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
अधिकारी दुर्लक्ष करतायेत?
रस्ता अडवण्याच्या प्रकाराबाबत प्रशासनाला वारंवार कळवण्यात आले, परंतु कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. उपोषणकर्त्या वनिता बोरकर यांनी सांगितले की, 'रस्ता अडवणाऱ्या विरोधात कारवाई होत नसल्याने आम्ही उपोषण करण्यात आहोत. जर निर्णय झाला नाही, तर आम्ही आमरण उपोषण सुरू करू!' या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, तसेच स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितले असले तरी अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.
झारगडवाडीतील महिलांनी आता महिला दिनीच या अन्यायाविरोधात लढण्याचा निर्धार केला आहे. आता प्रशासन काय भूमिका घेते आणि अडवलेला रस्ता मोकळा होतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!