विजय चिडे,प्रतिनिधी; छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठणच्या केकत जळगाव येथे दोन दुचाकीचा समोरा समोर अपघात होऊन एक जण ठार तर तीन जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना डोणगाव-विहामांडवा रस्त्यावरील घटना केकत जळगाव (ता.पैठण) येथील बढे वस्ती समोर बुधवारी (दि.9)रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली असून या अपघातात गणेश भाऊसाहेब बढे (वय 34)रा. केकत जळगाव, ता.पैठण हे ठार झाले आहेत, तर शिलाबाई बळीराम थोरे,( वय 32)रा.केकत जळगाव ता.पैठण, सागर दीपक मोरे ,निशा अनिल मोरे , रा.राजापिप्री ता.छ.संभाजीनगर हे गंभीर जखमी झाले आहेत.
याविषयी अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातील केकत जळगाव येथील गणेश बढे व शिलाबाई थोरे दोघं बहीण भाऊ खाजगी कामानिमित्त बुधवारी दुपारी एकच्या सुमारास दुचाकीवरून डोणगाव-विहामांडवा रस्त्यावरून पैठण येथे एचएफ डीलक्स क्रमांक (एम एच. 20.डिडि.4801) या गाडीने जात असताना केकत जळगाव येथील बढे वस्ती समोरसमोरून दुसरी दुचाकी भरधाव वेगात येत होती. यावेळी दोन्ही दुचाकीचा समोरासमोर धडक होऊन यामध्ये गणेश बढे हा जागीच ठार झाला तर त्याची बहीण शिलाबाई थोरे ही गंभीर जखमी झाली तर दुसऱ्या दुचाकी वरील सागर दीपक मोरे आणि निशा अनिल मोरे हे दोघेजण राजा पिंपरी येथील असून ते त्यांच्या कामानिमित्त विहामांडवा येथे त्यांच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आले होते, सकाळी नातेवाईकांच्या इथून भेट घेऊन ते पुन्हा दुचाकी पल्सर क्रमांक (एम एच.20.जी.एम.8590) हीने राजा पिंपरी येथे जाण्यासाठी निघाले असता. हा अपघात झाला.
हेही वाचा: बिहारमध्ये इंडिया आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन, राहुल गांधीच नेतृत्व; मोठ्या संख्येने विरोधक रस्त्यावर
हा अपघात एवढा भिषण होता की, दोन्ही दुचाकीचा समोरील भाग संपूर्ण चकना-चूर झाला असून अपघात झाल्यानंतर दोन्ही दुचाकी जवळपास तीस ते चाळीस फूट पेक्षा लांब फडफडत गेल्या होत्या. या अपघाताची माहिती स्थानिक नागरिकांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन चारही जखमींना तातडीने खाजगी वाहनाद्वारे पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब घुगे यांनी गणेश बढे यास तपासून मृत घोषित केले तर इतर जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी ताबडतोब छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या अपघाताची नोंद पाचोड पोलीस ठाण्यांत करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हरीशचंद्र बोबडे, रमेश शिंदे हे अधिकचा तपास करत आहेत.