अकोला: नुकताच अकोला शहरात घडलेला 'हिट अँड रन' चा भयावह थराराने संपूर्ण शहर हादरवून गेला आहे. हा धक्कादायक प्रकार मोठी उमरी परिसरातील जिल्हा परिषद शाळेसमोर सकाळच्या सुमारास घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली असून, ही दृश्यं हृदयाला हेलावून टाकणारी आहेत.
दुचाकीस्वाराला तब्बल दीड किमी अंतरापर्यंत फरफटत नेलं:
या घटनेमध्ये एका कार चालकाने रस्त्यावरून चालणाऱ्या सहा दुचाकीस्वारांना उडवलं. आश्चर्याची बाब म्हणजे, कारने एका दुचाकीस्वाराला तब्बल दीड किलोमीटर अंतरापर्यंत फरफटत नेल्याचं फुटेजमध्ये स्पष्ट दिसते. त्या व्यक्तीच्या जीवाला धोका निर्माण झाला असून, अजून दोन नागरिक या अपघातामध्ये गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची तीव्रता इतकी होती की काही क्षणातच रस्त्यावर एकच गोंधळ उडाला.
संतप्त नागरिकांनी केला कारचा पाठलाग:
ही घटना घडल्यानंतर संतापलेल्या नागरिकांनी त्या कारचा पाठलाग सुरू केला. तब्बल दीड किलोमीटरचा अंतर पार करत अखेर नागरिकांनी त्या कारला थांबवून त्यामध्ये स्वार असलेल्या कार चालकाला धर पकडलं. त्यानंतर संतप्त लोकांनी त्या चालकाला बेदम चोप दिला. त्यासोबतच, लोकांनी त्याच्या कारची तोडफोड केली. यादरम्यान, गाडीच्या काचादेखील फोडण्यात आल्या आणि संपूर्ण वाहनावर राग काढण्यात आला. ही प्रतिक्रिया नागरिकांच्या नाराजीच्या आणि असुरक्षिततेच्या भावना व्यक्त करणारी होती.
ही कार पोलिसाचीच? धक्कादायक माहिती समोर:
या घटनेमध्ये सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे ही कार एका पोलीस कर्मचाऱ्याची होती अशी माहिती समोर येत आहे. ही कार सदर सोलंके नावाच्या एका व्यक्तीची आहे अशी माहिती मिळाली असून, या कारचा वापर नेमकं कोण करत होता? हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यादरम्यान, पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतलं असून या घटनेवर पोलीस अधिक तपास करत आहेत.
नागरिकांमध्ये संतापाची लाट:
या घटनेनंतर मात्र अकोला शहरातील नागरिकांमध्ये तीव्र संतापाचं वातावरण पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस हा प्रकार वाढतच चालल्यामुळे, 'रस्त्यावरून जाताना आपण सुरक्षित तर आहोत ना?' हा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे. 'पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलं असलं, तरी अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी कडक पावलं उचलण्याची गरज आहे' अशी भावना यावेळी नागरिकांनी व्यक्त केली.