Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रात वादळी पाऊस आणि गारपीट, ८ जिल्ह्यांना हाय अलर्ट
Maharashtra Weather Alert : एप्रिल महिना म्हटलं की महाराष्ट्रात उकाड्याचा कडाका असतो. पण यंदाचा एप्रिल महिना अपवाद ठरत आहे. राज्यात उन्हाऐवजी अवकाळी पावसाचं जोरदार आगमन झालं आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, येत्या २४ तासांमध्ये पावसाचं जोर वाढण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांत वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे.
मागील ४८ तासांत राज्याच्या अनेक भागांत पावसानं हजेरी लावली आहे. यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्यांची स्थिती यामुळं वातावरणात मोठा बदल झालेला आहे. पाऊस आणि गारपिटीमुळं तापमानात ३-४ अंशांनी घट झाली आहे. अनेक शहरांमध्ये कमाल तापमान ३८-३९ अंशांवर आलं आहे.
हेही वाचा - कोपर आणि दिवा स्थानकादरम्यान लोकलमधून पडल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
या जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार, आज पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, लातूर, बीड, नांदेड, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर या भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. या जिल्ह्यात वाऱ्याचा वेग ताशी ४०-४५ किमीपर्यंत जाऊ शकतो. विजांसह होणाऱ्या पावसामुळं नागरिकांना घराबाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
हेही वाचा - घटस्फोटानंतर मुलाच्या Birth Certificate मधून पालकांचे नाव काढून टाकता येते का? मुंबई उच्च न्यायालयाने काय म्हटलं? जाणून घ्या
मुंबईत उन्हाचा कडाका
हवामान बदलाचा थेट परिणाम शेतकऱ्यांवर झाला आहे. हरभरा, गहू, डाळिंब आणि फळबागांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई आणि उपनगरांमध्ये मात्र परिस्थिती उलट आहे. तिथं उकाड्याचा जोर वाढत आहे. पुढील काही दिवस उन्हाच्या कडाक्यासह दमट वातावरण जाणवणार आहे.
उत्तर प्रदेशात पावसाचा अंदाज
देशात आज उत्तर प्रदेशमध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यूपीच्या १५ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यात दक्षिण यूपीचा भाग, बुंदेलखंड, आग्रा, मथुरासह १५ जिल्ह्यात आज पावसाचा अंदाज आहे. बांदा, चित्रकूट, कानपुर ग्रामीण, मथुरा, हाथरस, आग्रा, फिरोजाबाद, मैनपुरी, इटावा, औरैया, जालौन, हमीरपुर, महोबा, झांसी, ललितपुर या परिसराला रेड अलर्ट देण्यात आला आहे.