रायगड: मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव परिसरात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अखेर माणगावच्या रहिवाशांचा संयम सुटला असून, या समस्येवर त्वरित तोडगा काढण्यासाठी येथील स्थानिक रहिवाशांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये माणगावकरांनी आपली व्यथा मांडत सरकारकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे.
हेही वाचा: नव्याने उभारलेला पुतळा 100 वर्ष टिकणार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शिवरायांच्या पुतळ्याचे लोकार्पण
माणगाव हा रायगड जिल्ह्यातील एक महत्त्वाचा तालुका आहे आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महत्वाचा टप्पा आहे. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे येथील सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. खासकरून शनिवारी, रविवारी, सुट्टीच्या दिवशी आणि सणांच्या काळात तर या ठिकाणी वाहतुकीची समस्या आणखी दयनीय होते. या कोंडीचे संकट इतकं भयानक आहे की स्थानिकांना घराबाहेर पडणे, दवाखान्यात जाणे किंवा खरेदीसाठी बाजारात जाणे अवघड झाले आहे.
हेही वाचा: 'संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा'; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची मागणी
बिघडलेल्या या वाहतुकीचा थेट परिणाम आता माणगाव येथील स्थानिक व्यापारावर देखील झाला आहे. हॉटेल्स, दुकाने आणि विविध व्यवसायांमध्ये ग्राहकांच्या संख्येत घट झाली असून यामुळे व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. अनेकदा अन्नपदार्थ आणि इतर वस्तू आणणाऱ्या गाड्यांना तासंतास रस्त्यावर थांबावे लागते. यामुळे सेवा आणि वस्तूंच्या पुरवठ्यावर थेट परिणाम होत आहे. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी माणगाव येथील रहिवाशांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेण्याचा निश्चय केला. या बैठकीमध्ये माणगाव पोलीस निरीक्षक, तहसीलदार, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते. वाहतूक कोंडीमुळे निर्माण झालेल्या अडचणी मांडत माणगाव येथील रहिवाशांनी यावर त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. या बैठकीत वाहतुकीचे योग्य नियोजन, वाहतूक नियंत्रकांची संख्या वाढवणे, पर्यायी मार्ग विकसित करणे आणि सुट्टीच्या काळात आणि इतर वेळी ट्रक आणि जड वाहनांना वळवण्याची व्यवस्था करणे अशा विविध सूचना देण्यात आल्या होत्या. यासोबतच सिग्नल यंत्रणा, सीसीटीव्ही आणि बॅरिकेड्सच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्याबद्दलही चर्चा झाली.
हेही वाचा: चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची अजित डोवालांसोबत फोनवर चर्चा
सध्या माणगावचे रहिवासी प्रशासनाच्या कृतींवर लक्ष ठेवून आहेत आणि जर लवकरात लवकर या समस्येवर ठोस पावले उचलली गेली नाहीत तर आणखी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.