Sunday, August 31, 2025 09:10:04 AM

नागपूरमध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांची कार शर्यत; पोलिसांची मोठी कारवाई

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे नागपूर पोलिसांचा मोठा हस्तक्षेप

नागपूरमध्ये इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांची कार शर्यत पोलिसांची मोठी कारवाई

शर्यतीच्या नादात मोठा दंड; नागपूर पोलिसांची कडक कारवाई

नागपूर: शहरात वेगवान कार शर्यतीचा थरार अनुभवणाऱ्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांवर नागपूर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच कार जप्त केल्या असून, संबंधित विद्यार्थ्यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

ही घटना नागपूरच्या वाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. मिळालेल्या माहितीनुसार, काही इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी भरधाव वेगाने कार चालवत शर्यत लावली होती. विशेष म्हणजे, या विद्यार्थ्यांनी संपूर्ण शर्यतीचे व्हिडिओ रेकॉर्ड करून ते इंस्टाग्रामवर अपलोड केले. सोशल मीडियावर हे व्हिडिओ आणि रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपूर वाहतूक पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली. त्वरित तपास सुरू करून, व्हिडिओंमधून दिसणाऱ्या कारच्या क्रमांकाच्या आधारे संबंधित विद्यार्थ्यांचा शोध घेण्यात आला. त्यांच्या ओळखी पटवल्यानंतर पोलिसांनी मोटार वाहन कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई केली.

👉👉 हे देखील वाचा : पाशवी बहुमत असूनही रायगडला पालकमंत्री नाही; राजू शेट्टींची टीका

पोलिसांनी जप्त केलेल्या पाचही गाड्या विद्यार्थ्यांच्या मालकीच्या असून, या गाड्यांचे क्रमांक नोंदवून त्यांच्या पालकांनाही माहिती देण्यात आली आहे. नागपूर वाहतूक पोलिसांनी या घटनेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ताकीद दिली आहे की, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती झाल्यास त्यांच्यावर आणखी कठोर कारवाई केली जाईल.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये आणि सार्वजनिक ठिकाणी अपघातांचा धोका निर्माण होऊ नये, यासाठी नागपूर पोलिसांनी सतर्कता बाळगली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी अधिक कडक पावले उचलण्याचा इशारा दिला आहे.

पोलिसांचा इशारा: नागपूर पोलिसांनी शहरातील तरुणांना विनंती केली आहे की, वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे आणि कोणत्याही प्रकारची शर्यत किंवा अवैध वाहनप्रवास करू नये. सार्वजनिक ठिकाणी वेगाने वाहन चालवणे हे कायद्याच्या विरोधात असून, यामुळे स्वतःच्या आणि इतरांच्या जीविताला धोका निर्माण होऊ शकतो.


सम्बन्धित सामग्री