पुणे: अथर्व सुदामेचा मित्र आणि प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डॅनी पंडितने गुरुवारी गणेशोत्सवानिमित्त इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात हिंदू - मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यात आला आहे. डॅनी पंडितने पोस्ट केलेल्या या व्हिडिओला अनेक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आणि कंटेट क्रिएटर्सनी पाठिंबा दिला आहे. आता तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल की, या व्हिडिओत नेमकं आहे तरी काय? चला सविस्तर जाणून घेऊया.
गुरुवारी, प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर डॅनी पंडितने त्याच्या गणेशोत्सवानिमित्त इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यात हिंदू - मुस्लिम ऐक्याचा संदेश देण्यात आला आहे. या व्हिडिओत, डॅनी आणि त्याचे मित्र-मैत्रिणी गणपती बाप्पाची आरती करताना दिसतात. आरती झाल्यानंतर झोया नावाची मुलगी तिच्या अम्मीने बनवलेले उकडीचे मोदक प्रसादासाठी घेऊन येते. त्यानंतर, सगळेजण ते मोदक खातात.
अशाप्रकारे, या व्हिडिओतून हिंदू - मुस्लिम ऐक्याचा संदेश पाहायला मिळतो. विशेष म्हणजे, या व्हिडिओत, कोणतेही डायलॉग न वापरता केवळ फ्रेम्स आणि एक्सप्रेशन्सच्या माध्यमातून हिंदू - मुस्लिम ऐक्याचा भावनिक संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे.
काय होतं अथर्व सुदामेच्या Viral Video मध्ये?
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेने गणेशोत्सवानिमित्त इंस्टाग्रामवर हिंदू - मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारा व्हिडिओ पोस्ट केला होता. या व्हिडिओत, अथर्व सुदामे भाविकाच्या भूमिकेत होता आणि तो एका गणपतीच्या कारखान्यात जातो. तिथे काम करणारा माणूस मुस्लिम असतो. त्यामुळे, त्याला असं वाटतं की, अथर्व सुदामे आपल्याकडून मूर्ती खरेदी करणार नाही. एवढ्यात, अथर्व म्हणतो की, 'माझे वडील सांगतात की आपण साखर व्हावं, जी खीरही बनवते आणि शीर खुर्माही. तसंच आपण वीट व्हावं, जी वीट देवळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील. आपण फुल व्हावं जे हारात सुद्धा वापरलं जातं आणि चादरीत सुद्धा'.
हा व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर काही तासांतच वादाच्या भोवऱ्यात अडकला. ज्यामुळे, अथर्व सुदामेने माफी मागितली आणि तो व्हिडिओ डिलिट केला.