नाशिक : हिंदू समाजातील खाटिकांसाठी बंदरे व मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी नवीन उपक्रम जाहीर केला होता. हिंदू समाजातील खाटिकांना मल्हार सर्टिफिकेट दिले जाईल. तसेच ज्यांच्याकडे मल्हार सर्टिफिकेट असेल त्यांच्याकडूनच मटण खरेदी करा असेही मंत्री नितेश राणे यांनी सांगितले होते. राणे यांच्या भूमिकेला नाशिकमधील खाटीक समाजाने विरोध केला आहे.
मंत्री नितेश राणे यांनी हिंदू खाटिकांना मल्हार प्रमाणपत्र देणार असल्याचे सांगितले होते. ज्यांच्याकडे मल्हार सर्टिफिकेट असेल त्यांच्याकडून मटण खरेदी करण्याचे आवाहन त्यांनी केले होते. तसेच मटण विक्री करताना हलाल नाही तर झटका पद्धतीने करा असेही त्यांनी सांगितले होते. मात्र नाशिकच्या खाटीक समाजाने राणेंच्या भूमिकेवर विरोध दर्शवला आहे. हलाल पद्धतीनंच मटण विक्री करण्याचा निर्णय खाटीक समाजाने घेतला आहे. झटका नाही तर हलाल पद्धतीनेच मटण विक्री होणार असल्याची भूमिका खाटीक सामाजाने घेतली. हलालच्या मुद्यावर वादळ उठलेले असताना समाजाच्या बैठकीत हा निर्णय झाला.
हेही वाचा : कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती देताना कोर्टाचं महत्वपूर्ण निरीक्षण
मंत्री राणे यांच्या निर्णयावर याआधी शरद पवार गटाच्या जितेंद्र आव्हाडांनी टिका केली होती. आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी टिका केली आहे. नितेश राणे संधीसाधू माणूस आहे. त्यांचे वडील हलालचं मटण दाबून खाताना दिसतील. रमजानच्या कार्यक्रमात मटण तोडताना दिसतील असा हल्लाबोल विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
हलाल म्हणजे काय?
हलाल म्हणजे इस्लामिक कायद्यानुसार परवानगी असलेले अन्न आहे. या प्रक्रियेत प्राण्याला कमीत कमी त्रास सहन करावा लागतो. प्राणी बलिदान देताना देवाचं नाव घ्यावं लागते. एकाच प्रहारात धारदार चाकूने मारला जावा. मुस्लिम व्यक्तीने अल्लाहचे नाव घेत कत्तल करावी लागते.
झटका म्हणजे काय?
प्राण्याची मान एका झटक्यात वेगळी करणे. मारण्यापूर्वी प्राण्याला बेशुद्ध केलं जातं जेणेकरुन जास्त वेदना होत नाही. मारण्यापूर्वी प्राण्याला उपाशी ठेवलं जातं.