पवनी (भंडारा): पवनीतील गडकिल्ला परिसरात अतिक्रमण हटविण्याच्या शासन निर्णयाला विरोध करत अतिक्रमणधारकांनी गुरुवारी आक्रमक आंदोलन छेडले. या आंदोलनादरम्यान तहसील कार्यालयाच्या आवारात आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
विदर्भ क्रांती युवा मोर्चाचे हर्षल वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आंदोलकांनी अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'प्रथम पुनर्वसन, नंतर अतिक्रमण हटवा' अशी मागणी आंदोलकांनी लावली. शासनाने गडकिल्ला परिसरातील 183 अतिक्रमणधारकांना नोटीस बजावून अतिक्रमण हटविण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पुनर्वसनाची कोणतीही ठोस योजना नसल्याने अतिक्रमणधारकांमध्ये संताप उसळला आहे.
IPL 2025: RCB चा धक्कादायक निर्णय, टॉसला उतरला अनपेक्षित चेहरा; कोण आहे नवीन कॅप्टन? जाणून घ्या
या पार्श्वभूमीवर गुरुवारी आंदोलन अधिक तीव्र झाले. तहसील कार्यालयासमोर लाकडांची होळी करून आंदोलकांनी ती पेटवण्याचा प्रयत्न केला. तसेच एका महिलेसह काही आंदोलकांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला. प्रसंगावधान राखून पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत आत्मदहनाचा प्रयत्न रोखला आणि हर्षल वाघमारे यांच्यासह 200हून अधिक आंदोलकांना प्रतिबंधात्मक कारवाईत अटक केली. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.
दरम्यान, काँग्रेस पक्षानेही अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती देण्याची मागणी केली असून, त्यांनी तहसीलदार आणि नगरपालिका अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर केले आहे. काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, 'शासनाने केवळ अतिक्रमण हटविण्याचे आदेश न देता त्या नागरिकांचे पुनर्वसन आधी करावे. अन्यथा आम्हीही आंदोलन छेडू.'
शहरातील गडकिल्ला परिसर हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे. शासनाच्या म्हणण्यानुसार, या परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे झालेली असून त्याचा ऐतिहासिक स्थळाच्या सौंदर्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित रहिवाशांचा प्रश्नही तितकाच गंभीर आहे, अशी स्थानिक नागरिकांची भूमिका आहे.
या सगळ्या घडामोडींमुळे गडकिल्ला परिसरात सतत पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.