पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी येथील मुळशी शाखेचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांच्या सून, म्हणजेच वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूने राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांनी वापरलेली थार कार पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली आहे. अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यानंतर ते थार गाडी (MH 12 WH 0404) मध्ये प्रवास करत होते. अशातच, त्यांनी वापरलेली इंडेवर आणि बलेनो गाडी कधी जप्त केली जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर, त्यांचे सासरे (राजेंद्र हगवणे) आणि दीर (सुशील हगवणे) फरार झाले होते, मात्र शुक्रवारी पहाटे 4:30 वाजता पोलिसांनी त्यांना अटक केली. तसेच, 28 मे पर्यंत त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यादरम्यान, उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांनी मृत वैष्णवी कस्पटे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वैष्णवीच्या वडिलांना व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला आहे.
पिंपरीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे पदाधिकारी राजेंद्र हगवणे, त्यांचा मुलगा आणि त्यांची सून वैष्णवी हगवणे यांच्या आत्महत्येनंतर फरार होते, असे सांगितले जात होते. सासरे राजेंद्र हगवणे, सासू, पती, दीर आणि नणंद यांनी हुंड्यासाठी वैष्णवीवर अमानुष छळ केल्याचा आरोप आहे. प्रेम विवाहादरम्यान, राजेंद्र हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीच्या माहेरकडून लग्नासाठी 51 तोळे सोने घेतले होते. त्यासोबतच फॉर्च्युनर गाडी, 7 किलो वजनाची चांदीची ताटं, भांडी, महिन्यात जावयाला सोन्याची अंगठी, वैष्णवीच्या नवऱ्याला दीड लाखांचा मोबाईल गिफ्ट दिला गेला. माहेरी आल्यावर प्रत्येक वेळी 50 हजार ते 1 लाख रुपये दिले जात होते. मात्र, जमीन खरेदीसाठी 2 कोटींची मागणी माहेरकडून पूर्ण न झाल्यामुळे वैष्णवीला छळ करण्यात आला. ज्यामुळे तिने राहत्या घरी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. तसेच, पती शशांक वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. हगवणे कुटुंबीयांनी वैष्णवीला प्रचंड शारीरिक आणि मानसिक छळ केल्यामुळे वैष्णवीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.