पुण्यातील कोथरूड परिसरात गेल्या काही दिवसांपासून डुकरांच्या मृत्यूची मालिका सुरू होती. भारतीनगर नाला आणि भिमाले कॉर्नर परिसरात 6 फेब्रुवारीपासून मृत डुकरे आढळून येत होते. आतापर्यंत एकूण 54 डुकरांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. या डुकरांच्या शवविच्छेदनातून त्यांच्या मृत्यूचं खळबळजनक कारण उघड झालं आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या अहवालानुसार, या डुकरांवर विषप्रयोग करण्यात आला होता. पशुसंवर्धन विभागाच्या तपासणीत त्यांच्या अवयवांमध्ये ‘कार्बामेट’ हे घातक रसायन आढळून आलं आहे.
या धक्कादायक उघडकीनंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने कोथरूड परिसरात विशेष भरारी पथक तैनात केलं असून, या विषप्रयोगामागे कोण आहे, याचा शोध सुरू आहे. तसेच, या भागातील अन्य डुकरांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून, सातत्याने डुकरांचे मृतदेह सापडत असल्याने परिसरातील आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेकडून त्वरित स्वच्छता मोहीम राबवली जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
दरम्यान, कोथरूड परिसरातील रहिवाशांमध्ये मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. स्थानिक प्रशासन आणि पशुसंवर्धन विभाग या घटनेची गंभीर दखल घेत असून, या विषबाधेचं मूळ शोधण्यासाठी डुकरांच्या रक्त नमुन्यांची तपासणी सुरू आहे. डुकरांच्या मृत्यूमागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही, मात्र प्रशासन या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.