पुणे:अहिल्यानगर महामार्गावर कोरेगाव भीमा पुलावर रिक्षा चालकाने गाडीच्या काचा फोडून दहशत माजवल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे रिक्षा चालकांच्या अरेरावीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
काय घडलं नेमकं प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या रिक्षाचालक आणि कारचालकामध्ये वाघोली परिसरात किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका वाढला की रिक्षाचालकाने संतापाच्या भरात कारचा पाठलाग केला. कोरेगाव भीमा पुलाजवळ आल्यावर रिक्षा आडवी लावत लोखंडी रॉडने कारच्या काचा फोडल्या.या घटनेत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, या प्रकारामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा: शिक्षकाचं रूप की विकृती? भरवर्गात विद्यार्थिनींशी गैरवर्तन, पालक संतप्त!
हा प्रकार काही पहिल्यांदाच घडलेला नाही. काही दिवसांपूर्वी याच कोरेगाव भीमा पुलाजवळ दोन रिक्षाचालकांमध्ये वाद झाला होता, ज्यात एका रिक्षाचालकाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला होता. त्यामुळे रिक्षाचालकांच्या वाढत्या हिंसक वृत्तीचा मुद्दा गंभीर होत आहे.या घटनेनंतर आता पुणे शहर आणि पुणे ग्रामीण पोलीस अवैध वाहतूक करणाऱ्या तसेच रिक्षाचालकांच्या अरेरावीवर कठोर कारवाई करतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहरात आणि ग्रामीण भागात अनेक ठिकाणी रिक्षाचालकांची मनमानी वाढत आहे. अनेक वेळा किरकोळ वादाचे रुपांतर हाणामारीत होत असल्याने वाहनचालक आणि प्रवासी यांची सुरक्षा धोक्यात आली आहे.