सांगली: सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी मंत्रिपदाविषयी केलेल्या वक्तव्यानंतर जिल्ह्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. 'मलाही मंत्रिपद मिळावं ही अपेक्षा आहे', असं थेट आणि स्पष्ट विधान करून पाटील यांनी एकप्रकारे स्वतःच्या भावी राजकीय वाटचालीची दिशा सूचित केली आहे. त्यामुळे ते लवकरच कोणत्यातरी पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आता उफाळून आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमात अपक्ष खासदार म्हणाले:
नुकतेच विशाल पाटील अपक्ष खासदार म्हणून निवडून आले आहेत. नुकताच त्यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या कार्यक्रमात अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी स्पष्ट भूमिका घेत म्हणाले, 'मी काँग्रेससोबत नाही, पण भविष्यात दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात नक्कीच जाणार आहे'. त्यांनी केलेल्या या विधानाला अधिक राजकीय वजन प्राप्त झालं आहे.
विशाल पाटील भाजपाच्या वाटेवर? राजकीय वर्तुळात चर्चा:
जयकुमार गोरे हे स्वतः एकेकाळी अपक्ष म्हणून राजकारणामध्ये सक्रिय होते. ते सध्या भाजपकडून मंत्रीपद भूषवत आहेत. जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी केलेल्या वक्तव्यानंतर 'विशाल पाटील भाजपाच्या वाटेवर?' हा प्रश्न राजकीय वर्तुळात जोरात चर्चिला जात आहे. विशेष बाब म्हणजे सांगली जिल्ह्यातील काँग्रेस समर्थक आणि स्थानिक नेत्यांमध्ये मात्र या घडामोडींमुळे अस्वस्थता पसरली आहे.
विशाल पाटील यांनी आपली महत्त्वाकांक्षा उघडपणे मांडली:
'गोरेंना मंत्रिपद मिळालं, मग आम्हालाही का नाही?', असा सवाल उपस्थित करत, विशाल पाटील यांनी आपली महत्त्वाकांक्षा उघडपणे मांडली आहे. हे वक्तव्य केवळ एका अपक्ष खासदाराची भावना नाही, तर भविष्यातील राजकीय समीकरणांना चालना देणारा संकेत म्हणून पाहिलं जात आहे. त्यांनी काँग्रेसला स्पष्टपणे बाजूला ठेवलं असून, दुसऱ्या पक्षात जाण्याची तयारीही व्यक्त केली आहे. यामुळे त्यांचा भाजपकडे कल असल्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.
अपक्ष खासदार यांच्या वडिलांचं काँग्रेससोबतचं जिव्हाळ्याचं नातं:
सांगलीतून अपक्ष खासदार म्हणून निवडून आलेले विशाल पाटील यांचे वडील विलासराव पाटील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. ज्यामुळे त्यांच्या घराण्याशी काँग्रेसचं जिव्हाळ्याचं नातं होतं. मात्र, अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसपासून स्वतःला वेगळं करत नव्या राजकीय प्रवासाची तयारी केली आहे, हे त्यांच्या सध्याच्या भूमिकेतून स्पष्ट होत आहे.
राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही:
राजकीय जाणकारांचं असं म्हणणं आहे की, 'सांगलीमध्ये असलेली सध्याची राजकीय परिस्थिती आणि आगामी स्थानिक व विधानसभेच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवता, विशाल पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यांच्या मंत्रिपदाच्या इच्छेमुळे, राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही'.
सांगली जिल्ह्यात आगामी राजकीय नकाशा कसा रंगतो, विशाल पाटील कोणत्या पक्षात प्रवेश करतील? आणि त्यांना मंत्रिपद लाभतं का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. मात्र, सध्या त्यांच्या विधानामुळे संपूर्ण जिल्ह्यात राजकीय चर्चांना अक्षरशः ऊत आला आहे.