Sharad Pawar on Dhananjay Munde : बीडमधल्या मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर 2024 मध्ये क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या घटनेनंतर या प्रकरणात आरोपींना अटक झाली. थोडं उशिराच, पण या कटाचा सूत्रधार वाल्मिक कराडलाही अटक झाली. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा खास आहे. त्यामुळे सदर प्रकरणात धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी सातत्याने होत होती. या प्रकरणाने संपूर्ण बीड जिल्हा पेटून उठल्याचं दिसत होतं. मस्साजोग गावचे ग्रामस्थ आणि दिवंगत देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आंदोलन छेडलं होतं.
इतकं सगळं होऊनही धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला नव्हता. अखेर 3 मार्चला संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले. त्यानंतर धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. अखेर मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राजीमाना सोपवला. याबाबत प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांचं मे 2024 मधलं एक वक्तव्यही व्हायरल होत आहे. धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस आहे, असं शरद पवार म्हणाले होते.
हेही वाचा - Navneet Rana: '...त्यांनी औरंगजेबाची कबर आपल्या घरी न्यावी,' नवनीत राणा यांचा हल्लाबोल
शरद पवारांबाबत काय म्हणाले होते धनंजय मुंडे?
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मागच्या वर्षी लोकसभा निवडणुकीचा प्रचार मे महिन्यांत सुरू होता. जुलै 2023 मध्ये अजित पवार यांनी 41 आमदारांना बरोबर घेत महायुतीसह जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात टोकाचे मतभेद झाले. याबाबत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले होते की, 'तुम्ही (शरद पवार) पुलोद सरकार स्थापन केलं, ते संस्कार आणि अजित पवार महायुतीबरोबर गेले तर ते गद्दार? शरद पवारांनी भाजपाशी चर्चा केल्या होत्या. शिवसेनेला बाजूला ठेवण्याचा आग्रह केला. ते सगळे संस्कार होते, आम्ही निर्णय घेतला तर आम्ही गद्दार? ही निवडणूक भाऊबंदकीची नाही. देशाचा पंतप्रधान ठरवण्याची ही निवडणूक आहे. देशाचा पंतप्रधान मोदी होतील की इतर कोण? हे ठरवण्याची ही निवडणूक आहे.' याबाबत शरद पवार यांना विचारलं असता धनंजय मुंडे लायकी नसलेला माणूस आहे असं त्यांनी म्हटलं होतं.
धनंजय मुंडेबाबत काय म्हणाले होते शरद पवार?
'धनंजय मुंडे म्हणजे लायकी नसलेला माणूस. त्यांना कशा कशांतून बाहेर काढलं आहे हे जर सांगितलं तर, त्यांना बाहेर फिरणं मुश्कील होईल. एकंदरीत त्यांनी केलेले उद्योग आणि इतर गोष्टींबाबत मी आत्ता बोलू इच्छित नाही. एका लहान कुटुंबातला उदयोन्मुख तरुण नेता म्हणून त्यांना हाताला धरुन विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी दिली. लोकांची नाराजी होती तरीही मी त्यांना ही जबाबदारी दिली. हे सगळं माहीत असतानाही ते माझ्यावर व्यक्तिगत हल्ले करू लागले आहेत. कुटुंबावर हल्ले करत आहेत. मी त्यांच्याबाबत आज जे बोललो ते शेवटचं.. यापुढे मी काही बोलणार नाही.'
हेही वाचा - मुंडेंच्या राजीनाम्यावर धसांनी केले मोठे वक्तव्य; नेमकं काय म्हणाले धस?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे विजयी झाले. त्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मंत्रीही होते. मात्र, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराड असल्याने आणि तो धनंजय मुंडेंचा जवळचा माणूस असल्याने अखेर धनंजय मुंडेंना मंत्रीपद सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यानंतर आता शरद पवार यांचं हे वक्तव्य व्हायरल झालं आहे.