शिवसेना महिला आघाडीने राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आगारांमधील महिलांसाठी उपलब्ध असलेल्या सोयी-सुविधांचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. महिलांना प्रवासादरम्यान येणाऱ्या अडचणी, स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या समस्या सोडवण्याच्या उद्देशाने ही पाहणी करण्यात येणार आहे.
शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार, पक्षाच्या महिला आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हा आणि तालुका स्तरावर एसटी आगारांना भेट देऊन पाहणी करावी. या पाहणीत खालील मुद्द्यांचा आढावा घेतला जाणार आहे:
महिला प्रवाशांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहे
प्रवाशांसाठी बसस्थानकांवरील विश्रांतीगृहांची स्थिती आणि स्वच्छता
टिकट काउंटर आणि प्रवाशांसाठी उपलब्ध विश्राम जागा
महिला अधिकाऱ्यांसाठी स्वतंत्र सुविधा व त्यांचे कार्यस्थळी सुरक्षितता उपाय
पिण्याच्या स्वच्छ पाण्याची उपलब्धता आणि खाद्यपदार्थांच्या स्वच्छतेची पाहणी
शिवसेना महिला आघाडीच्या सचिव डॉ. मनीषा कायंडे यांनी सांगितले की, हा उपक्रम महिलांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असून, आगारांमधील सुविधांची पाहणी करून अहवाल पक्षाकडे सादर केला जाईल. यासोबतच, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणा करण्यासाठी सूचना दिल्या जातील.
हेही वाचा :Pune Rape Case: पुणे बलात्कारप्रकरणी राजकीय मंडळींची प्रतिक्रिया; काय म्हणाले?
सदर पाहणी 28 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत होणार असून, आढावा अहवाल पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे सादर केला जाणार आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी हा महत्त्वाचा निर्णय असल्याने महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.