चंद्रपूर: 11 मे रोजी तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेलेली वृद्ध महिला वाघाच्या हल्ल्यामध्ये ठार झाल्याची हृदयद्रावक घटना मूल तालुक्यातील नागाळा गावात घडली असून विमल बुद्धाजी शेंडे (वय: 65) असे मृत महिलेचे नाव आहे. चंद्रपूर जिल्ह्यात तेंदूपत्ता तोडण्याचा हंगाम सुरूवातीला आहे. त्यामुळे, पहाटेपासून ग्रामीण भागातील महिला-पुरुष तेंदूपत्ता तोडण्यासाठी जंगलात जातात. वर्षातून एकदा येणाऱ्या हंगामातून गरीब कुटुंबांना थोडीफार आर्थिक मदत मिळते.
हेही वाचा: तुर्कीच्या सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांचा बहिष्कार
नेमकं प्रकरण काय?
मूल तालुक्यातील नागाळा गावातील विमल बुद्धाजी शेंडे या वृद्ध महिला रविवारी तेंदूपत्ता तोडण्यासाठी चिचप्पली वनपरिक्षेत्रातील 537 कंपार्टमेंटमध्ये गेल्या होत्या. तेव्हा तग धरून बसलेल्या या नरभक्षी वाघाने संधी साधून त्यांच्यावर हल्ला केला. यात त्या ठार झाल्या. बराच वेळ झाला तरी विमल शेंडे या वृद्ध महिला घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना शोधण्यास सुरुवात केली. मात्र, काहीही सापडले नाही. अखेर, चिचपल्ली वन विभाग आणि पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी येऊन कुटुंबीयांना भेट घेतली. त्यानंतर माहिती घेऊन चिचपल्ली वनपरिक्षेत्रात शोधाशोध सुरू केली. तेव्हा कंपार्टमेंट नंबर 537 मध्ये या वृद्ध महिलेचा मृतदेह छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला. त्यामुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. वन आणि पोलीस विभागाने मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला. त्यानंतर मृतक महिलेच्या कुटुंबीयांना तातडीने पंचवीस हजाराची आर्थिक मदत करण्यात आली.
हेही वाचा: देशभरातील 32 विमानतळं वाहतुकीसाठी खुली
काही दिवसांपूर्वी, मूल तालुक्याला लागून असलेल्या सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माळ गावातील तीन महिला तेंदूची पाने तोडण्यासाठी जंगलात गेल्या होत्या. तेव्हा एका नरभक्षी वाघाने त्यांच्यावर हल्ला केला आणि एकानंतर एक तिघांनाही ठार केले. ही घटना ताजी असतानाच, जवळच्या मूल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. त्यामुळे सिंदेवाही आणि मूल तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाघांच्या या प्रकोपावर तातडीने बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी दोन्ही तालुक्यांतील नागरिकांनी केली आहे.