Sunday, August 31, 2025 09:01:27 PM

सोलापूर एमआयडीसी आगीत आठ जणांचा मृत्यू; अंबादास दानवे संतप्त

सोलापूर एमआयडीसीतील टॉवेल कारखान्यात भीषण आग; आठ जणांचा मृत्यू, दोन कुटुंबे उद्ध्वस्त. अंबादास दानवे यांची भेट, फायर यंत्रणेवर गंभीर सवाल.

सोलापूर एमआयडीसी आगीत आठ जणांचा मृत्यू अंबादास दानवे संतप्त

सोलापूर: सोलापूरच्या एमआयडीसी परिसरात असलेल्या सेंट्रल टेक्सटाईल टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत आठ जणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या दुर्घटनेत मंसुरी आणि बागवान कुटुंबातील चार-चार सदस्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. विशेषतः दीड वर्षाच्या बाळाचा मृत्यू झाल्याने सोलापूरकरांमध्ये शोककळा पसरली आहे.

या घटनेनंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दुर्घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना सांत्वन दिले. मंसुरी कुटुंबातील महंमद हनीफ मंसुरी यांची भेट घेताना दानवे स्वतःही भावुक झाले. मृतांमध्ये उस्मान मंसुरी, अनस मंसुरी, शिफा मंसुरी आणि बाळ युसुफ मंसुरी यांचा समावेश आहे.

हेही वाचा: Heavy rain alert: अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र; कोकणात मुसळधार पावसाचा इशारा, रायगड-रत्नागिरी रेड अलर्टवर

घटनेनंतर प्रशासन आणि एमआयडीसी अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दानवे यांनी अधिकाऱ्यांना थेट जाब विचारत फटकारले. 'फायर ब्रिगेडची यंत्रणा सक्षम असती, तर हे प्राण वाचू शकले असते,' अशी कठोर प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, 'ही कारवाई फक्त माध्यमांसमोरच न करता संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन गंभीर चर्चा केली जाईल,' असेही त्यांनी स्पष्ट केले.

दानवे यांनी या प्रकरणात गुन्हा दाखल होणारच, अशी ठाम भूमिका घेतली. आगीमुळे झालेली जीवितहानी आणि यंत्रणेतील त्रुटी याकडे त्यांनी लक्ष वेधले. 'वेळीच मदत पोहोचली असती, तर मृत्यू टाळता आले असते,' असे सांगत त्यांनी प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

या भीषण आगीत दोन कुटुंबांची संपूर्ण वाताहत झाली आहे. अशा दुर्घटना टाळण्यासाठी फायर सेफ्टीसारख्या यंत्रणांचे वेळेवर काम करणे अत्यावश्यक आहे


सम्बन्धित सामग्री