मुंबई : परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू पोलीस मारहाणीतच झाला असल्याचे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालात म्हटले आहे. यामुळे पोलिसांवर ठपका लागला आहे. गोपनीय अहवाल मानवाधिकार आयोगासमोर सादर करण्यात आला आहे.
परभणीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळील राज्यघटनेच्या प्रतीची विटंबना करण्यात आली. ही घटना 11 डिसेंबर 2024 रोजी घडली. त्यानंतर
दलित संघटनांनी राज्यघटनेच्या प्रतीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ परभणीमध्ये आंदोलन केलं होतं. जाळपोळ व तोडफोड केल्यानंतर पोलिसांनी अनेकांना अटक केली. त्यात सोमनाथ यांचाही समावेश होता.
हेही वाचा : माजी उपसरपंचाच्या हत्येनं जळगाव हादरलं; चाकूने भोसकून केली हत्या
अहवालात नेमकं काय?
सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचं न्यायदंडाधिकाऱ्यांनी अहवालातून सांगितले आहे. सूर्यवंशींच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार आहेत. परभणीतील नवामोंढा पोलीस ठाण्यात सूर्यवंशींना मारहाण करण्यात आली. गोपनीय अहवाल मानवाधिकारी आयोगासमोर सादर करण्यात आला आहे. सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाची आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे. तसेच संबंधित पोलिसांना उत्तर पाठवण्याची नोटीस देण्यात आली आहे.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणामुळे विरोधकांनी सातत्याने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच त्यांच्या मृत्यूमुळे मोर्चेही काढण्यात आले होते. आता पोलीस मारहाणीत मृत्यू होऊनही सत्य लपवण्यात आलं. महाराष्ट्र कुठे चाललाय? हा प्रश्न पडतोय. सरकार सत्य का लपवत होतं? अस सवाल शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. दरम्यान पोलीस मारहाणीत मृत्यू होणं, हे गृहखात्याचं अपयश असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे. तर सोमनाथ सूर्यवंशींनाही न्याय मिळाला पाहिजे असे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच सत्ताधारी पक्षातील आमदारांनीही सोमनाथ सूर्यवंशींच्या प्रकरणावर भाष्य केले आहे. सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस कोठडीत होणं गंभीर आहे. मुख्यमंत्री संबंधितांवर कठोर कारवाई करतील असे राष्ट्रवादी पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.