मुंबई: मुंबईतील शिवसेना भवनासमोर 'पुन्हा येणार ठाकरे सरकार' अशा आशयाचे बॅनर लावण्यात आले असून, या फलकामुळे चर्चेला सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाने लावलेल्या या बॅनरमध्ये 'सूत्र जुळणार, महाराष्ट्राचे चित्र बदलणार' अशा आशयाचे वाक्यही आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात येत्या काळात मोठे बदल होणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
या फलकावर स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, 'महाराष्ट्राच्या राजकारणात काही वर्षात समीकरणे बदलणार आहेत.' ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे की, सध्याच्या अडचणींवर मात करून उद्धव ठाकरे पुन्हा सत्तेत येतील.
हेही वाचा:उद्धव ठाकरेंना राणे समर्थकांनी डिवचलं; वाढदिवसानिमित्त मातोश्रीबाहेर फलकबाजी
हेही वाचा:'ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं' संदीप देशपांडेंचा ठाकरे गटावर घणाघात
शिवसेना भवनासमोर लावलेले हे बॅनर केवळ राजकीय घोषणाबाजी नसून, कार्यकर्त्यांमधील आत्मविश्वास आणि आशेचे प्रतीक मानले जात आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गट सध्या राजकीयदृष्ट्या अनेक आव्हानांना सामोरे जात आहे. पक्ष फोड, नेत्यांचे विभाजन, आणि विधानसभा-लोकसभा निवडणुकांमध्ये अपयश अशा संकटांमुळे पक्ष अडचणीत आहे. मात्र या कठीण काळातही शिवसैनिकांमध्ये पक्षप्रमुखांवर असलेला विश्वास कायम असून, पुन्हा सत्तेत येण्याच्या आशेनेच अशा प्रकारची फलकबाजी होत आहे.