Sunday, August 31, 2025 12:02:26 PM

उबाठा गटात अंतर्गत कलह; अंधारे चिडल्या दानवे चूप

कुंभारवळण येथे शेतकरी आंदोलक अंजना कामठे यांच्या शोकसभेत ठाकरे गटातील अंबादास दानवे व सुषमा अंधारे यांच्यातील मतभेदामुळे अंतर्गत वाद राजकीय चर्चेचा विषय ठरला.

उबाठा गटात अंतर्गत कलह अंधारे चिडल्या दानवे चूप

पुणे: पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण येथे शेतकरी आंदोलक कै. अंजना महादेव कामठे यांच्या निधनानंतर आयोजित करण्यात आलेली शोकसभा एका अंतर्गत वादामुळे चर्चेचा विषय ठरली. या शोकसभेत ठाकरे गटातील नेत्यांमध्येच एकमेकांबद्दल नाराजी व्यक्त झाली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि नेत्या सुषमा अंधारे यांच्यातील क्षणिक वाद आता राजकीय चर्चेचा विषय ठरत आहे.

शनिवारी कुंभारवळण येथे अंजना कामठे यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी अंबादास दानवे, आमदार सचिन अहिर आणि सुषमा अंधारे हे ठाकरे गटाचे प्रमुख नेते पोहोचले होते. आंदोलक शेतकऱ्यांचा आरोप आहे की, विमानतळाच्या प्रस्तावित जागेमुळे निर्माण झालेल्या मानसिक दबावामुळे अंजना कामठे यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला.

सदर ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये गावकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर थेट अंबादास दानवे यांनी शोकसभा संबोधित केली. मात्र, सुषमा अंधारे यांना मंचावर बोलण्याची संधीच मिळाली नाही, यामुळे त्या नाराज झाल्या.

हेही वाचा: लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीत गोंधळ; 2100 रुपये देणे शक्य नाही...संजय शिरसाट यांची स्पष्ट भूमिका

शोकसभा संपल्यानंतर अंबादास दानवे माध्यमांशी संवाद साधत असतानाच, सुषमा अंधारे यांनी मंचावरच उपस्थित महिला शेतकऱ्यांशी संवाद साधायला सुरुवात केली. त्यांनी माईक घेतला आणि महिलांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी अंबादास दानवे यांनी ताई, तुम्ही थांबा, खाली या, माईक बंद करा, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. यावर सुषमा अंधारे चिडल्या आणि त्यांनीच दानवेंना फटकारले; अहो, आधी आपण यांच्याशी संवाद तरी साधूया, नंतर काहीही बोलू,असे म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

या प्रकारामुळे मंचावरील वातावरण काही काळासाठी तणावपूर्ण झाले. एकीकडे ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरलेली असताना दुसरीकडे ठाकरे गटातील दोन प्रमुख नेत्यांमध्येच निर्माण झालेल्या मतभेदांनी उपस्थितांमध्ये संभ्रम निर्माण केला. सुषमा अंधारे यांची नाराजी स्पष्ट दिसून येत होती, तर अंबादास दानवे हे संमेलनाचे शिस्तबद्ध नियोजन करत असल्याची भूमिका घेत असल्याचे बोलले जात आहे.

हा प्रकार म्हणजे ठाकरे गटात सुरू असलेल्या अंतर्गत विसंवादाचे आणखी एक उदाहरण असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. शोकसभेसारख्या संवेदनशील प्रसंगी एकमेकांवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केल्याने गटातील एकात्मतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

या प्रकरणावर पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी हा प्रकार सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. आगामी काळात ठाकरे गट यावर कसा तोडगा काढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सम्बन्धित सामग्री