येवला: राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा नियोजित होता. यासाठी संघटनेने पोलिस प्रशासनाकडे अधिकृत परवानगीची मागणी केली होती. मात्र कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करत पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली.
'मोडेल पण वाकणार नाही' छावा क्रांतिवीर सेनेची भूमिका:
परवानगी नाकारल्यानंतरही छावा क्रांतिवीर सेनेने आंदोलनाचा निर्णय बदलला नाही. 'शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आम्ही मागे हटणार नाही', असा ठाम निर्धार करत मोर्चेकऱ्यांनी बैलगाड्यांसह रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला. यामुळे पोलिस प्रशासनात खळबळ उडाली. मोठ्या प्रमाणावर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला. काही ठिकाणी आंदोलनकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्नही करण्यात आला, मात्र मोर्चा ठरल्याप्रमाणे पुढे गेला.
'शेतकरी जागा हो, लढा करा' आंदोलकर्त्यांची जोरदार घोषणा:
या मोर्चात बैलगाड्यांचे ताफे, हातात शेतकऱ्यांच्या न्यायासाठी घोषणा करणारे फलक, पारंपरिक वेशभूषेत सहभागी कार्यकर्ते अशा भव्य स्वरूपात सहभाग होता. ‘शेतकरी जागा हो, लढा करा’, ‘कर्जमाफी मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही’ अशा जोरदार घोषणा देत आंदोलनकर्ते तहसील कार्यालयावर धडकले. छावा क्रांतिवीर सेनेच्या या निर्धारामुळे शेतकरी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनासमोर मोठं आव्हान उभं राहिलं असून, हे आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.