जळगाव: जळगाव शहरात दिवसेंदिवस कार चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र, यावेळी चोरट्यांनी हद्द पार करून चक्क आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने मोठी चोरी केली. ज्यामुळे पोलीस थक्क झाले. नुकताच, निमखेडी शिवारात घडलेल्या कार चोरीच्या घटनेनंतर अवघ्या काही दिवसांतच रामानंद नगरात दुसरी घटना घडली आहे. या घटनेमुळे जळगाव शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
लॅपटॉपच्या सहाय्याने गाडी अनलॉक केली:
रामानंद नगरातील सुप्रसिद्ध उद्योजक किशोर ढाके यांच्या घरासमोरील परिसरात उभी असलेली इनोव्हा कार चोरट्यांनी चक्क लॅपटॉपच्या मदतीने अवघ्या नऊ मिनिटांत पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना पहाटे 4:37 वाजता घडली. चोरटे एक कार घेऊन आले आणि अत्यंत नियोजित पद्धतीने त्यांनी कारचा मागचा काच फोडला. त्यानंतर लॅपटॉपच्या सहाय्याने गाडी अनलॉक करून कार सुरू केली आणि 4:46 वाजेपर्यंत ते तेथून पसार झाले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही घटना झाली कैद:
किशोर ढाके यांनी या घटनेचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना उपलब्ध करून दिले असून, ते सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहे. या व्हिडिओमध्ये चोरट्यांची अत्यंत आधुनिक आणि प्रशिक्षित पद्धत स्पष्टपणे दिसून येते. विशेष बाब म्हणजे, कार चोरी करत असताना त्यांनी कोणतेही गोंधळ निर्माण न करता अगदी थोड्याच वेळात कार घेऊन पलायन केले.
या घटनेनंतर ढाके कुटुंबीयांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तातडीने तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस तपास सुरू असून, सीसीटीव्ही फूटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आधुनिक तंत्रज्ञानाने वाहनचोरी चिंताजनक बाब:
अशा प्रकारे, जळगावमध्ये तांत्रिक साधनांचा वापर करून वाहनचोरी होणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे, आणि यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारची घटना रोखण्यासाठी पोलिसांनी अधिक दक्षता घेणे गरजेचे आहे. परिसरात नाकाबंदी वाढवणे, गस्ती पथकांना सक्रिय करणे आणि नागरिकांनी स्वतःच्या वाहनांच्या सुरक्षेसाठी आधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवणे यासारखे उपाय आवश्यक ठरत आहेत.
नागरिकांमध्ये संतापाची लाट:
या घटनेमुळे, नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले असून शहरातील सुरक्षिततेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. उद्योजक किशोर ढाके यांनी पोलिस प्रशासनाला कारवाईसाठी आवाहन केले असून, चोरट्यांचा जलद शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली जात आहे.