बीड: वडिलांच्या हत्येनंतर घडलेल्या प्रत्येक क्षणाला सामोरं जात, वैभवी देशमुखने आपल्या यशाने पुन्हा एकदा संघर्षाला नवी ओळख दिली आहे. बीड जिल्ह्यातील माशाजोग गावातील वैभवीने बारावीच्या परीक्षेत 85 टक्के गुण मिळवून दाखवून दिलं की दुःखाच्या गर्तेतही मेहनत आणि जिद्द आपलं स्थान निर्माण करू शकते. तिचं हे यश केवळ शैक्षणिक नाही, तर सामाजिक अन्यायाविरुद्ध उभ्या राहिलेल्या एका मुलीचं उत्तर आहे.
आज वडील असते, तर त्यांनी माझ्या पाठीवर अभिमानाने हात ठेवला असता, असे भावूक शब्द वैभवी देशमुखने उच्चारलेत , जीने बारावीच्या परीक्षेत 85 टक्के गुण मिळवत आपल्या संघर्षमय प्रवासाला यशाची किनार दिली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गाव हे फक्त नकाशावरील एक ठिकाण नाही, तर आज जिथून एक जिद्दी तरुणीचा आवाज संपूर्ण राज्यात पोहोचतोय. वैभवी ही त्या गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या. डिसेंबर 2024 मध्ये तिच्या वडिलांची एका खंडणीखोर टोळीने निर्घृण हत्या केली. त्यांनी सौरऊर्जा प्रकल्पात अवैधरित्या मागितल्या जाणाऱ्या 2 कोटी रुपयांच्या खंडणीला विरोध केला आणि त्याची किंमत प्राण गमावून चुकवावी लागली.
हेही वाचा: वन्यजीव संरक्षण कायद्याचा भंग? छाया कदम यांच्या विरोधात तक्रार दाखल
9 डिसेंबर रोजी त्यांचे डोंगाव टोल नाक्यावरून अपहरण करण्यात आले आणि एका निर्जन ठिकाणी लोखंडी वायर, लाकडी दांडके आणि गॅस पाइप यांच्या साहाय्याने अमानुषपणे मारहाण करण्यात आली. या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले आणि राज्यभर संतापाची लाट उसळली.
या घटनेनंतर वल्मिक काराड आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा संबंध उघडकीस आला. जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर अखेर मार्च 2025 मध्ये मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला.
या सगळ्या काळात वैभवीने फक्त वडिलांसाठी न्याय मिळवण्याची लढाई लढली नाही, तर स्वतःच्या शिक्षणाचीही लढाई लढली. विविध चौकशी, मोर्चे, आंदोलनं, आणि मानसिक तणाव यांच्या दरम्यान तिने बारावीची तयारी सोडली नाही.
आज जेव्हा निकाल लागला, तेव्हा तिच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. ती म्हणाली, मी NEET ची तयारी करत आहे. डॉक्टर होणं हे माझ्या वडिलांचं स्वप्न होतं. आज तो माझा ध्यास झालाय. त्यांच्या आठवणींचं बळ घेऊन मी पुढे जाईन.
वैभवीचं हे यश फक्त गुणांमध्ये मोजता येणार नाही. तिच्या संघर्षाच्या मागे आहे वडिलांचा आदर्श, आईचा पाठिंबा, आणि स्वतःची न थांबणारी जिद्द.
आज तिची कहाणी अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरते. वैभवीने दाखवून दिलं की कठीण प्रसंगातही जर जिद्द असेल, तर स्वप्नांपर्यंत पोहोचणं अशक्य नाही.