मुंबई: देशातील प्रसिद्ध कंपनी अदानी पॉवरने मोठा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी भागधारकांची मंजुरी मिळाल्यानंतर, कंपनीने आपल्या शेअर्सच्या स्प्लिटची घोषणा केली आहे. त्यांचा पहिला स्टॉक स्प्लिट 1:5 या प्रमाणात होईल. याचा अर्थ 10 रुपये दर्शनी मूल्य असलेला एक शेअर आता दोन रुपये दर्शनी मूल्याच्या पाच शेअर्समध्ये रुपांतरित होईल. हा कंपनीचा पहिला मोठा कॉर्पोरेट निर्णय आहे. यामुळे थेट गुंतवणूकदारांना फायदा होईल.
अदानी पॉवरने एक्सचेंज फाइलिंगमध्ये स्क्रुटिनायइरचा अहवाल आणि पोस्टल बॅलेटचा निकाल सादर केला. यावेळी त्यांनी सांगितले की, या प्रस्तावाला मोठ्या संख्येने भागधारकांनी हिरवा कंदील दाखवला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने 1 ऑगस्ट 2025 रोजीच या स्टॉक स्प्लिटला मंजुरी दिली होती. त्याच दिवशी त्यांनी जून तिमाहीचे निकालही जाहीर केले होते.
हेही वाचा: Gold Rate Today: सोन्याच्या भावात उलटफेर, ग्राहकांना मोठा दिलासा; तुमच्या शहरातील आजचे दर जाणून घ्या
स्टॉक स्प्लिटनंतर अदानी पॉवरच्या इक्विटी शेअर्सची संख्या 2 हजार 480 कोटींवरून 12 हजार 400 कोटींवर जाईल. कंपनीने सुरुवातीला रेकॉर्ड डेट जाहीर केली नव्हती. पण आता ती 22 सप्टेंबर निश्चित केली आहे. याचा अर्थ त्या दिवशी ज्या गुंतवणूकदारांकडे शेअर्स असतील त्यांनाच स्प्लिटचा फायदा मिळेल.
गेल्या शुक्रवारी अदानी पॉवरचा शेअर हिरव्या चिन्हावर बंद झाला. कंपनीचा शेअर 609.90 रुपयांवर उघडला. तर मागील दिवसाचा शेअर 608.50 रुपये होता. दिवसाच्या व्यापारात तो 601.80 रुपयांच्या नीचांकी पातळीवर गेला. पण अखेरीस 610.30 रुपयांवर बंद झाला म्हणजेच 0.26 टक्क्यांंची वाढ नोंदवली.
अदानी पॉवर ही भारतातील सर्वात मोठी 13 हजार 650 मेगावॅटपेक्षा जास्त क्षमतेसह खाजगी वीज निर्मिती करणारी कंपनी आहे. कंपनी देशातील अनेक राज्यांमध्ये कोळसा-आधारित आणि नवीकरणीय अशा दोन्ही प्रकारच्या प्रकल्पांवर काम करते. स्टॉक स्प्लिटनंतर शेअरची तरलता (लिक्विडिटी) वाढेल आणि अधिक किरकोळ गुंतवणूकदार त्यात सहभागी होऊ शकतील अशी आशा कंपनीला आहे.