मुंबई : राज्यात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस तापमानात चांगलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिक काळे कपडे घालणे टाळताना दिसत आहेत. आता मार्च ते मे महिनाअखेरपर्यंत अंगाची अगदी लाही-लाही होण्याची चिन्हं आतापासूनच दिसू लागली आहेत. घरातून बाहेर पडल्यानंतर कडक ऊन त्यातच वाऱ्याचा अभाव त्यामुळे अंगातून घामाच्या धारा निघतात. त्यामुळे उन्हाळ्यात सूती कपडे वापरा, तसेच गडद रंगाचे कपडे घालू नका असा सल्ला अनेकदा प्रशासनामार्फतच दिला जातो.
वकीलांना मात्र न्यायालयात काळा कोट घालणे बंधनकारक असते. उन्हाळ्याच्या दिवसात या कोटमुळे वकीलांना उष्णतेचा सामना करावा लागतो यादरम्यान वाढते तापमान लक्षात घेऊन महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने (बीसीएमजी) वकिलांना दरवर्षी 1 मार्च ते 30 जून या कालावधीत काळा कोट परिधान करण्याची गरज नसल्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यापूर्वी वकीलांना त्यांच्या ठरवून दिलेल्या ‘ड्रेस कोड’मधून मिळणारी सूट यापूर्वी फक्त मे ते जून या उन्हाळ्याच्या दिवसांमध्येच दिली जात होती. मात्र ही सूट आता 1 मार्चपासून सुरू करण्यात आली आहे.
हेही वाचा - संतोष देशमुख हत्या प्रकरण: सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'परळीचे लोक साधे सरळ.. पण फक्त दोन जणांमुळे..'
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलने याबद्दलचे परिपत्रक 27 फेब्रुवारी रोजी जारी केले आहे. यामध्ये दरवर्षी 1 मार्च ते 30 जून पर्यंत ही सूट वाढवण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. बार अँड बेंचने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
या परिपत्रकात असे लिहिले आहे की, “पोशाख नियमांसाठी उन्हाळी महिन्यांचा अर्थ 1 मार्च ते 30 जून दरम्यानचे महिने असा असेल. त्यानुसार, दरवर्षी 1 मार्च ते 30 जून दरम्यान वकिलांना काळे कोट/जॅकेट घालण्यापासून सूट दिली जाईल.”
उन्हाळ्यात काळे कपडे का घालू नये?
काळ्या रंगाच्या कपड्यात जास्त गरम होण्याचे मुख्य कारण म्हणजे हा रंग उष्णतेचा शोषण (Absorption) करतो. उन्हाळ्यात काळा कपडा परिधान केल्यानंतर त्यात शोषून घेतलेली उष्णता लवकर परावर्तित (Reflected) होत नाही. त्यामुळे या रंगाच्या कपड्यांमध्ये फार जास्त उष्णता जाणवते. या कारणामुळे उन्हाळ्यात काळे कपडे घालू नये असे सांगितले जाते.
पांढऱ्या किंवा फिकट रंगाचे कपडे का वापरावे?
त्याउलट उन्हाळ्यात सूती, फिकट किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घाला, असा सल्ला दिला जातो. कारण पांढऱ्या रंगाच्या कपड्यात उष्णतेचे कमी शोषण (Absorption) होते. याचाच अर्थ असा की पांढऱ्या किंवा फिकट रंगाच्या कपड्यांवर सूर्याचा प्रकाश जास्त काळ टिकत नाही. त्यामुळे यात फारसे गरम होत नाही. यामुळे उन्हाळ्यात लोक पांढर्या कपड्यांना जास्त प्राधान्य देतात.
हेही वाचा - CIBIL Scoreचा वापर करून गाड्या चोरण्याची भन्नाट शक्कल, कारची शोरूममधून खरेदी आणि काळ्या बाजारात विक्री..