मुंबई: रविवारी सकाळी, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे भर विधानसभेत 'जंगली रमी' खेळत होते. हा व्हिडिओ शेअर करत आमदार रोहित पवार म्हणाले की, 'जंगली रमी पे आओ ना महाराज...'. हा व्हिडिओ व्हायरल होताच अनेक नेत्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर निशाणा साधला. यावर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी अनोख्या शैलीत उत्तर दिले.
काय म्हणाले माणिकराव कोकाटे?
'वरच्या सभागृहात कामकाज तहुकुब झाल्याने मी तिथे बसलो होतो. त्यामुळे, खालच्या सभागृहात काय सुरू आहे? हे पाहण्यासाठी मी मोबाईल ओपन केला. मोबाईल ओपन केल्यानंतर जेव्हा मी युट्युबवर जात होतो, तेव्हा अनेक जाहिराती माझ्या समोर आले. त्या जाहिराती स्किप कराव्या लागतात. त्या जाहिराती स्किप करताना दोन-तीन सेकंद लागले. तेव्हा, त्यांनी 18 सेकंदाचाच व्हिडिओ दाखवला. त्यांनी पुढचा व्हिडिओ दाखवलाच नाही. ते कधी माझ्या कपड्यावर बोलतात. तर कधी माझ्या कधी माझ्या गाडीवर बोलतात. पण माझ्या धोरणावर, माझ्या कामावर आणि मी शेतकऱ्यांसाठी केलेल्या उपाययोजनांवर कोणताही विरोधी पक्षाचा नेता बोलत नाही. माझं काम पारदर्शी आहे. माझा स्वभाव स्पष्ट आहे. कोणत्याही प्रकारे सभागृहात बसू नये, हा नियम मला माहीत आहे.
'रमी'वर स्पष्टीकरण देत कोकाटे म्हणाले...
'सभागृहात अनेक कॅमेरे सुरू असतात. मी कशाला गेम खेळत बसू? गेम खेळण्याचा मुद्दाच येत नाही. मी स्किप करण्यासाठी प्रयत्न केला. माझ्या लक्षात नाही आलं की लगेच कसं स्किप करतात? पण स्किप झालेला व्हिडिओ तुम्ही दाखवलाच नाही. एकदा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. मग तुमच्या लक्षात येईल की मी स्किप केलं की नाही? कोणी व्हिडिओ शूट केला याबद्दल काहीच हरकत नाही. मात्र, माझ्या खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे? ते बघण्यासाठी मी मोबाईलवर युट्युब बघत होतो. त्यावर डाऊनलोड झालेला गेम मी स्किप करण्याचा प्रयत्न करत होतो. मात्र, स्किप करताना तिथे कोणीतरी माझा व्हिडिओ काढला असावा', असं कृषिमंत्री कोकाटे म्हणाले.
रोहित पवारांवर टीका करत कोकाटे म्हणाले की, 'आतापर्यंत माझ्या संदर्भात रोहित पवारांचे काय प्रश्न आहे? शेतकऱ्यांसंदर्भात काय प्रश्न आहे? शेतकऱ्यांची काळजी त्यांनाच आहे का? आम्हाला नाही का? आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो, विभागात जातो, शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो, नवीन धोरण तयार करतो, इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसत नाही. हे रिकामे उद्योग कसे दिसतात? उगीचच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना जनता बळी पडणार नाही'.