Anandacha Shidha Scheme: राज्यातील गरीब व गरजू नागरिकांसाठी दिवाळी आणि इतर सणांच्या काळात दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ यंदा मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सणासुदीच्या काळात कमी दरात आवश्यक अन्नपदार्थ पुरवण्याचा उद्देश असलेली ही योजना गेल्या दोन वर्षांत जनतेत लोकप्रिय ठरली होती. मात्र यंदा सरकारच्या आर्थिक नियोजनावर आलेल्या ताणामुळे ही योजना रद्द होण्याची शक्यता आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने अलीकडेच 'लाडकी बहीण' योजनेसाठी मोठा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे अन्य सामाजिक योजनांच्या निधीत कपात करण्याची गरज निर्माण झाली आहे. या आर्थिक अडचणीचा थेट फटका 'आनंदाचा शिधा' आणि 'शिवभोजन थाळी' या दोन्ही योजनांना बसला आहे.‘आनंदाचा शिधा’ या योजनेअंतर्गत, गरिबांना दिवाळी, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अशा सणांच्या निमित्ताने स्वस्त दरात चणा डाळ, साखर आणि खाद्यतेल असलेला किट केवळ 100 रुपयांत दिला जात होता. गेल्या दोन वर्षांत या योजनेचा लाभ लाखो कुटुंबांनी घेतला. परंतु यंदा ही योजना रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात असून त्याबाबत सरकारकडून अधिकृत घोषणा अपेक्षित आहे.
हेही वाचा: 40 समर्थकांची नावं बनावट? शिवसेनेत प्रवेशावरून मोठा गौप्यस्फोट
त्याचप्रमाणे, गरीब व गरजूंसाठी सुरु असलेल्या ‘शिवभोजन थाळी’ योजनेवरही खर्चाची कात्री चालवण्यात आली आहे. योजनेसाठी लागणाऱ्या अंदाजे 60 कोटी रुपयांच्या तुलनेत, सरकारने केवळ 20 कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे शिवभोजन केंद्रांची संख्या वाढवणे शक्य नसेल, अशीही माहिती समोर आली आहे.