मुंबई: मराठी मुद्द्यावर भाष्य करणारे तसेच, महायुतीच्या सरकारवर हल्लाबोल करणारे मनसे नेते संदीप देशपांडे सध्या चर्चेत आहे. याचं कारण म्हणजे संदीप देशपांडे यांनी दादरमध्ये एक नवीन उपहारगृहाची स्थापन केले आहे, ज्याचं नाव आहे 'इंदुरी चाट आणि बरंच काही...'. या उपहारगृहाचे उद्घाटन झाल्यानंतर, संदीप देशपांडेंनी स्वत: त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी असा उल्लेख केला की, 'सुप्रसिद्ध व नामांकित शेफ शिप्रा खन्ना आणि रश्मी उदयसिंग यांनी दादर येथील मी सुरु केलेल्या "इंदुरी चाट आणि बरंच काही...." या उपहारगृहाला भेट दिली'.
मात्र, याच गोष्टीवरून भाजपच्या कार्यकर्त्यांनी संदीप देशपांडे यांच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली आहे. भाजप समर्थकांच्या पेडवरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये असा सवाल उपस्थित करण्यात आला की, 'या हॉटेलचा कूक परप्रांतीय, या हॉटेल मधील पदार्थ परप्रांतीय, प्रमोशन करत आहेत ते पण परप्रांतीय, नाव देवनागरी लिपीत लिहिलं आहे.... यांना स्वतःच्या हॉटेल मध्ये मराठी आचारी बसवता येत नाही ते मराठी महापौर करण्याच्या गप्पा मारत आहेत... महापौर मराठीच होणार पण महायुतीचा हिंदुत्ववादी विचारांचा .... लांडाळलेला नाही!'.
मात्र, एवढ्यावरच न थांबता भाजपच्या समर्थकांनी टोलेबाजी करत संदीप देशपांडे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो लावत, 'हमारे संदीप भय्या के दुकान में आनेका हा' अशा व्यंगात्मक पोस्टही शेअर केले. यामुळे, सोशल मीडियावर मनसे विरुद्ध भाजप कार्यकर्ते असा वाद पेटला आहे.
हेही वाचा: Makarand Anaspure : आरक्षणाच्या मुद्द्यावर ज्येष्ठ अभिनेते मकरंद अनासपुरेंनी सोडले मौन; म्हणाले, 'जर समाज तुटला तर ...'
या टीकेला प्रत्तुत्तर देताना संदीप देशपांडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. देशपांडे म्हणाले की, 'इंदुरी चाट आणि बरंच काही उपगृहावरून मला ट्रोल करणाऱ्यांना इतिहास माहित नाही. मराठे पूर्वी मध्य प्रदेशातील इंदूर भागात गेले होते आणि तिथल्या स्थानिक खाद्यसंसकृतीवर त्यांनी आपला प्रभाव टाकला. त्यामुळे, इंदूरमध्ये तयार होणारे पदार्थ इंदुरी फूड म्हणून ओळखले जाऊ लागले. आज जे पदार्थ आम्ही या उपहारगृहात देत आहोत, त्यामागे मराठ्यांचा इतिहास दडलेला आहे. त्यामुळे, मला टीका करणाऱ्यांनी ही केवळ अज्ञानातून आलेली आणि बुद्धीची दिवाळखोरी आहे'.