माळेगाव: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवारही मैदानात उतरले आहेत. अजित पवार यांनी ब वर्ग मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. साखर कारखाना निवडणुकीसाठी स्वतः अजित पवार रिंगणात उतरल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच, माळेगाव कारखान्याचा चेअरमन कोण असेल? याबद्दल उत्सुकता होती. पण, अजित पवार यांनी एका जाहीर सभेत स्वतःचे नाव जाहीर केले आणि त्यानंतर जोरदार घोषणाबाजी झाली.
हेही वाचा: नागपुरात इंडिगो विमानाचं इमर्जन्सी लँडिंग;157 प्रवासी सुखरूप
शनिवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले की, 'कारखान्याचा चेअरमन मीच होणार आहे. माझ्याकडे बघून मतदान करा. जर पाच वर्षांत भाव नाही दिला तर नावाचा अजित पवार नाही.' काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी प्रचाराच्या सुरुवातीलाच माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदाची घोषणा करणार असल्याचे सांगितले होते. यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार मंगळवारी कोणाच्या नावाची घोषणा करणार याची सर्वांना उत्सुकता होती. मात्र, अजित पवारांनी स्वतःच्या नावाची घोषणा केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.