मुंबई: काही दिवसांपासून सातत्याने शिवसेनेतील मंत्री आणि आमदारांचे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. त्यामुळे शिवसेनेतील मंत्री आणि आमदार वादग्रस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील मंत्री आणि आमदारांना कानपिचक्या दिल्या आहेत. मला कारवाई करायला भाग पाडू नका असे शिंदेंनी म्हटले आहे.
'बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं'
शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदे यांनी झापलं आहे. तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं. तुमचे आमदार काय करतात असा प्रश्न मला विचारला जातो? तुम्ही सगळी माझी माणसं आहात. आपलं कुटुंब एक आहे. तुमची बदनामी म्हणजे माझी बदनामी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चुकीच्या गोष्टींवर ऊर्जा वाया घालवू नका. कमी बोला जास्त काम करा. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं असा अप्रत्यक्ष इशाराही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला आहे.
हेही वाचा: मराठवाड्यात 90 टक्के पेरणी पूर्ण; शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत
शिंदेंच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना कानपिचक्या
शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना एकनाथ शिंदे यांनी कानपिचक्या व अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "तुमच्याकडे दाखवलेलं बोट हे माझ्याकडे असतं. बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागलं. माझ्या परिवारावर कारवाई करायला, मला अजिबात आवडणार नाही. परंतु मला कारवाई करायला भाग पडणार नाही. तसंच तुमच्याकडून काम अपेक्षित आहे ".
'कारवाईचा बडगा उगारायला अजिबात आवडणार नाही'
आपल्या परिवारावर कारवाईचा बडगा उगारायला मला अजिबात आवडणार नाही. परंतु, मला कारवाई करायला भाग पडणार नाही तसंच काम तुमच्याकडून अपेक्षित आहे. मी रागावत नाही. मी प्रमुखासारखं वागत नाही, कार्यकर्त्यासारखं वागतो. तुम्हीही तसंच वागा. आपल्या डोक्यात हवा जाऊ देता कामा नये. कितीही पदं मिळाली तरी कार्यकर्ता आहे असंच समजून कामं करा असे शिंदेंनी म्हटले आहे. तसेच कमी वेळात जास्त यश मिळालंय. लोकं आपल्या पाठीशी आहेत. त्यामुळे बदनामीचे डाव रचले जात आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीची काळजी घ्या. यापुढील काळ कसोटीचा आहे. सामाजिक जीवनात पथ्य पाळावी लागतात. ती काळजी घ्या असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेतील मंत्री आणि आमदारांना सांगितले आहे.