यवतमाळ: शुक्रवारी(11 जुलै) जय महाराष्ट्र ने दाखवलेल्या बातमीचा एकाच दिवसात इम्पॅक्ट पाहायला मिळतोय. पाच दशकापासून गावाला रस्ताच नसलेल्या तालुक्यातील जनुना वरुडबिबी येथे चिखलाच्या रस्त्यामुळे गावात वाहन येत नाही . त्यामुळे एका वयोवृद्ध रुग्णाला उपचारा करीता दोन किलो मिटर खाटेवर उचलुन नेण्यात आल्याची बातमी जय महाराष्ट्र ने दाखवली होती. याच बातमीची दखल घेण्यात आली आहे. गावाला एक कोटी 48 लाख रुपये प्राप्त होणार असून दिंडाला ते जनुना रस्त्याचे खडीकरण करण्यात येणार आहे तसेच वीस लाख रुपये गावातील सिमेंट रस्ते,वीस लाख रुपये शाळेतील दुरुस्ती फ्लेवर ब्लॉक वर्गखोल्या दुरुस्तीसाठी शासनाकडून मंजूर करून घेवून रस्त्याचे आज भुमीपुजन भाजप नेते नितीन भुतडा यांनी केले आहे.
वरुडबिबी अतर्गत जनुना हे आदिवासी समाजाचे छोटे गाव आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली पण गावाला अजुन पर्यंत रस्ता नाही. पावसाळ्यात आहे तो रस्ता पुर्णतः चिखलमय झालेला आहे. अशा परिस्थितीत मागील दहा वर्षात रस्त्यातच अनेक गरोदर महिलाची प्रसूती झाली आहे. आजारी व्यक्ती व गरोदर महिलांना तातडीचे वैदयकिय मदत मिळणे अशक्य आहे. असेच एका वृद्ध व्यक्तीस बाजेवरून रुग्णालयात नेले आहे, तरी लोकप्रतीनिधी, अधिकारी यांनी लक्ष घालून पक्कया रस्त्याचे काम करून दयावे. अशी गावकरी मंडळीची मागणी केल्याचे व रुग्णाला खाटेवरून रुग्णालयात नेत असल्याचे वृत्त जय महाराष्ट्र वाहिनीने काल दाखवले होते. या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत नितिन भुतडा यांनी आज भुमीपुजन करून रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे . यावेळी माजी आमदार विजय खडसे, अमानपूर सरपंच बाबूलाल चव्हाण, चिली सरपंच बळीराम राठोड, बोथा सरपंच गणेश राठोड,सुकळी सरपंच शिवाजी रावते, दिंडाला सरपंच कैलास राठोड,वरूड बीबी सरपंच तुकाराम जाधव गजानन मोहळे, विक्की जोशी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.