मुंबई: आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये राडा घातल्याचा प्रकार सध्या चर्चेत आहे. आमदार निवासातल्या निकृष्ट जेवणामुळे आमदार गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे. आमदार निवासातील वरण खाल्ल्यावर संजय गायकवाडांना मळमळ सुरु झाली. त्यामुळे त्यांनी कॅन्टीनमध्येच राडा घातला आणि तेथील कर्मचाऱ्याला मारहाण केली.
'आमदार, मंत्र्यांना कोणता माज आलाय माहीत नाही?'
दरम्यान संजय गायकवाडांनी केलेल्या मारहाणीचा विरोधकांची समाचार घेतला आहे. तर महायुतीच्या नेत्यांनी सारवासारव केल्याचे पाहायला मिळत आहे. आमदार, मंत्र्यांना कोणता माज आलाय माहीत नाही? असे काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गायकवाडांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण प्रकरणी म्हटले आहे. तसेच पटोलेंनी मारहाणीचा निषेध केला आहे. गरीब माणसाला मारहाण करण्यासाठी सत्तेत पाठवलं नाही असे म्हणत पटोलेंनी गायकवाडांची कान उघडणीही केली आहे. डाळ खराब असण्याला सरकार जबाबदार आहे. यापेक्षाही वाईट डाळ आदिवासी पाड्यांवर असते. मोदी सरकार जे फुकट धान्य वाटप करत त्याची गुणवत्ता बघा. अशाप्रकारे टॉवेलवर एका आमदारानं मारहाण करायची का?असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला आहे. तर आमदार निवासात मारहाण करुन काय आदर्श देणार? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी गायकवाड प्रकरणावर केला आहे. निकृष्ट दर्जाचं जेवण देण्यास विरोधच आहे. परंतु संजय गायकवाडांनी केलेली मारहाण अयोग्य असल्याचे प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी दिली आहे. सरकारने आमदार निवासातील निकृष्ट जेवणाकडे लक्ष दिलं पाहिजे तसंच संजय गायकवाडांवर सरकारने कारवाई करावी, अशीही मागणी अस्लम शेख यांनी केलीय. कँटीनचालकाला मारहाण करून मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न संजय गायकवाड यांच्याकडून झाला आहे असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
हेही वाचा: पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; दोन स्पा सेंटरवर पोलिसांची छापेमारी
'गायकवाडांनी मारहाण करणं अयोग्य'
महायुतीच्या नेत्यांनीही संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणी भाष्य केले आहे. गायकवाडांवर मारहाण करण्याची वेळ का आली?गायकवाडांशी बोलून माहिती घेणार असे मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटले आहे. मारहाणीचं समर्थन करत नाही मात्र प्रतिक्रिया देणं स्वाभाविक आहे. कॅन्टीन चालकाचं कंत्राट रद्द करावं असे राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. संजय गायकवाडांनी मारहाण करणं चुकीचं असल्याचे अनिल परबांच्या प्रश्नावर फडणवीसांनी उत्तर दिले आहे. निकृष्ट जेवणामुळे गायकवाड संतापले. मात्र मारहाण करणं अयोग्य असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केले आहे.
गायकवाड का संतापले?
आकाशवाणी आमदार निवासात निकृष्ट जेवण देण्याचा प्रकार घडला आहे. मंत्रालयासमोरील कॅन्टीनला शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी रूम नंबर 107 वर ऑर्डर दिली असता अत्यंत निकृष्ट वास येणारे वरण देण्यात आले. ते वरण खाल्ल्यावर पोटामध्ये मळमळू लागल्याने आमदारांनी कॅंटिनमध्येच राडा केला. यावेळी त्यांनी कॅंटीन चालकास फैलावर घेतलं. कॅन्टीनमध्ये त्यांनी कर्मचाऱ्याला मारहाण केली. या मारहाण प्रकरणामुळे संजय गायकवाड यांच्यावर टीकेचा वर्षाव होत आहे.