मुंबई: मागील काही दिवसांपासून ठाकरे बंधू एकत्र दिसत आहेत. अशातच, ठाकरे बंधूंबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यावर्षी दसरा मेळाव्यासाठी राज ठाकरेंना आमंत्रित करणार का? याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. यंदाच्या दसरा मेळाव्याबद्दल ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी एक विधान केले होते. 'आगामी दसरा मेळाव्यात तुम्हा सर्वांना चांगली बातमी मिळेल. कदाचित आमच्या पक्षाकडून राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रित केले जाऊ शकते', अशी प्रतिक्रिया सचिन अहिर यांनी दिली होती.
यावर, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, 'राज ठाकरे यांना दसरा मेळाव्यासाठी आमंत्रित केले जाईल की नाही हे माननीय उद्धव ठाकरे ठरवतील. यावर मी किंवा इतर कोणीही मत व्यक्त करणे योग्य नाही आणि सध्या तरी असे होण्याची शक्यता मला दिसत नाही. दोन्ही पक्ष वेगळे आहेत, दोन्ही पक्षांचे मेळावे वेगळे असतात. कार्यकर्त्यांचे ठिकठिकाणचे जे मेळावे आपण पाहतात ते स्वतंत्रपणे होत आहेत. पण नक्कीच भविष्यात राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र येऊन काम करण्यावरती आमच्यात सहमती झालेली आहे'.