धुळे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिनानिमित्त ठाकरे बंधूंनी एकत्र येण्यासाठी धुळ्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकाऱ्यांनी मिळून खानदेशची कुलस्वामिनी आई एकवीरा देवीला महाआरती करून साकडं घालण्यात आली. वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची जनता त्रस्त झाली आहे. अशातच, ठाकरे बंधूंनी एकत्र यावे, हीच सर्वसामान्य नागरिकांची मागणी आहे. यासाठी एकविरा देवीकडे प्रार्थना करण्यात आली. यावेळी एकमेकांना लाडू भरवत शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच दोन्ही पक्षांच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.
हेही वाचा: पाणीपुरवठा करणारी धरणं किती रिकामी आहेत? जाणून घ्या
जसे लोणावळा येथे एकविरा देवीचे मंदिर आहे, तसंच खानदेशातील धुळे शहराजवळ पांझरा नदीच्या किनारी देखील एकविरा देवीचे मंदिर आहे. भक्तांच्या संकटांना धावून येणारी, त्यांची मनोकामना पूर्ण करणारी तसेच नवसाला पावणारी स्वयंभू देवी म्हणून एकविरा मातेची ओळख आहे. हे देवस्थान महाराष्ट्रातील अतिशय जागृत आणि पाचवे शक्तीपीठ देवस्थान म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, राजस्थान, कर्नाटक तसेच गुजरातमधील अनेक भाविक खानदेशची कुलस्वामिनी आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी लाखोच्या संख्येने भेट देतात.