मुंबई : शरद पवार यांचा 85वा वाढदिवस संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. विशेषतः यंदाचा वाढदिवस राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे, कारण पक्षात झालेल्या फूटीनंतर काका शरद पवार आणि पुतणे अजित पवार यांची ही भेट चर्चेचा विषय बनली आहे.
दिल्लीतील शरद पवार यांच्या निवासस्थानी अजित पवार यांनी पत्नी सुनिता पवार आणि मुलगा पार्थ पवार यांच्या समवेत जाऊन शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सुप्रिया सुळे, प्रफुल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे या नेत्यांचीही उपस्थिती होती.
अजित पवार म्हणाले, “राजकारण फक्त संघर्षाचे नव्हे, तर सुसंस्कृत चर्चेचेही व्यासपीठ आहे. आज साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. त्यांनी नेहमीप्रमाणे आम्हाला मार्गदर्शन केले.” ही भेट कौटुंबिक स्वरूपाची असून, त्यामध्ये कोणत्याही राजकीय विषयांवर चर्चा झालेली नाही, असे अजित पवार यांनी माध्यमांना सांगितले.
शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पवार कुटुंब एकत्र आल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. पक्षांतर्गत तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट राजकीय शांततेचा संकेत देणारी ठरू शकते. कुटुंबीयांच्या या ऐक्याने शरद पवारांचे नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी अधोरेखित होते, ज्यामुळे आगामी राजकीय हालचालींवरही सर्वांचे लक्ष आहे.