IND vs AUS: टीम इंडियाने उडवला ऑस्ट्रेलियाचा धुव्वा, बदला घेत Champions Trophy च्या फायनलमध्ये धडक
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला धुव्वा उडवत ICC Champions Trophy 2025 स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे. सेमीफायनल सामन्यात टीम इंडियाने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही आघाड्यावर चांगली कामगिरी करत ऑस्ट्रेलियाचा 4 गडी राखून पराभव केला. विराट कोहलीच्या खणखणीत 84 धावा, श्रेयस अय्यरसह त्याची 98 धावांची भागीदारी, हार्दिक पांड्याचे मोक्याच्या क्षणी सलग 2 षटकार आणि केएल राहुलच्या विजयी षटकाराने भारताने ऑस्ट्रेलियाला चितपट केले.
दुबई येथे खेळल्या गेलेल्या सेमीफायनल सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत टीम इंडियासमोर 265 धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाने हे आव्हान सहज पार केले. मोहम्मद शमी आणि विराट कोहली हे टीम इंडियाच्या विजयाचे हिरो ठरले.
टीम इंडियाच्या डावाची सुरुवात काहीशी खराब झाली. सलामीवीर रोहित शर्मा (28) आणि शुभमन गिल (8) स्वस्तात बाद झाले. टीम इंडियाने 2 विकेट्स लवकर गमावल्या. त्यानंतर विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांनी 98 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. कोहलीने 98 चेंडूत 5 चौकारांसह 84 धावा केल्या. श्रेयस अय्यरनेही 41 धावांचे योगदान दिले.
शेवटच्या टप्प्यात हार्दिक पांड्याने 2 षटकार ठोकून सामना भारताच्या बाजूने वळवला. तर के. एल. राहुलने विजयी षटकार ठोकत सामना संपवला. अक्षर (27),हार्दिक (28) धावांचे योगदान दिले. तर केएल राहुल 42 धावांवर नाबाद राहत संघाला विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन आणि झम्पा यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
तत्पूर्वी, स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा ऑस्ट्रेलियाचा डाव दोन्ही डावखोर फलंदाज ट्रेविस हेड आणि कॉनोली यांनी सुरू केला. सुरुवातीलाच कॉनोली शून्यावर माघारी परतला. त्यामुळे कर्णधार स्टीव्ह स्मिथवर मोठी जबाबदारी आली. खतरनाक फलंदाज अशी ओळख असलेल्या हेडला दोन वेळा जीवदान मिळाले. त्यानंतर त्याने आक्रमक फटक मारण्यास सुरूवात केली. हेड भारतासाठी डोकेदुखी ठरू पाहत होता.
हेही वाचा - IPL 2025 tickets LIVE : हवी ती जागा पटकन बुक करा!
तेव्हा वरुण चक्रवर्तीने 39 धावांवर त्याला बाद करत भारताला मोठे यश मिळवून दिले. यानंतर कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाबुशेन यांनी मिळून अर्धशतकी भागीदारी करत डाव सावरला. स्मिथने 73 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तर लाबुशेनने 29 धावा करून त्याला साथ दिली. पण या भागीदारीनंतर भारतीय गोलंदाजांनी पुन्हा सामना भारताच्या बाजूने वळवला. लाबुशेनची शिकार जडेजाने केली. तर त्यानंतर आलेल्या इंग्लिश देखील फारशी कमाल दाखवू शकला नाही. त्याला व्यक्तिगत 11 धावांवर जडेजाने विराट कोहलीकरवी झेलबाद केले. तर ग्लेन मॅक्सवेलला (7) अक्षर पटेलने स्वस्तात बाद केले.
हेही वाचा - Champion Trophy 2025: वसीम अक्रम पाकिस्तान क्रिकेट संघावर चिडला..
ऑस्ट्रेलियाच्या डावातील सर्वात महत्त्वाची खेळी अॅलेक्स कॅरीने केली. त्याने शेवटच्या टप्प्यात आक्रमक फलंदाजी करत 57 चेंडूत 61 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 250 धावांचा टप्पा पार केला. कॅरीने 8 चौकार आणि 1 षटकार खेचत भारतीय फिरकीपटूंना बॅकफूटवर ढकलले होते.
भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात सातत्याने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत ठेवले. मोहम्मद शमीने 3 विकेट्स घेत शानदार कामगिरी केली. वरुण चक्रवर्ती आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. अक्षर पटेलनेही 1 बळी घेतला. भारतीय गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाला 300 धावांची मजल मारू दिली नाही.