Trump Helicopter Emergency Landing: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे हेलिकॉप्टर शुक्रवारी आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. ट्रम्प युके दौऱ्यानंतर अमेरिकेला परतण्यासाठी चेकर्सहून लंडनच्या स्टॅन्स्टेड विमानतळाकडे निघाले होते. मात्र, मरीन वन हेलिकॉप्टरमध्ये हायड्रॉलिक तांत्रिक बिघाड झाल्याने ते मधल्या टप्प्यात लुटन विमानतळावर उतरवावे लागले. त्यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यांना दुसऱ्या हेलिकॉप्टरमधून स्टॅन्स्टेड विमानतळावर हलवण्यात आले. तिथून ते अमेरिकेला जाणाऱ्या विमानात चढले.
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी घटनेला दुजारा दिला. त्यांनी सांगितले की, राष्ट्राध्यक्ष आणि फर्स्ट लेडी सुरक्षित आहेत. ट्रम्प यांनी प्रवासानंतर पत्रकारांना सांगितले, मला आता घरी जायचे आहे आणि मला आशा आहे की प्रवास सुरक्षित होईल. युकेचा दोन दिवसांचा दौरा यशस्वी ठरला. मी ब्रिटिश पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यासोबत चर्चा केली. राजघराण्याकडून उत्साही स्वागत मिळाले.
हेही वाचा - US On Gaza Ceasefire : गाझा युद्धबंदी ठरावाला अमेरिकेचा सहाव्यांदा व्हेटो; पॅलेस्टिनी जनतेवर संकट कायम
सुरक्षा वैशिष्ट्यांनी सज्ज हेलिकॉप्टर
राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे मरीन वन आणि मरीन टू हेलिकॉप्टर अत्याधुनिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली, रडार आणि जॅमिंग उपकरणांनी सज्ज आहेत. अणुबॉम्बच्या प्रभावांनाही तोंड देण्यास हे सक्षम मानले जातात. या हेलिकॉप्टरसोबत साधारणतः ऑस्प्रे एमव्ही-22 ग्रीन टॉप्स विमानांचा गटही असतो, ज्यामुळे राष्ट्राध्यक्षांचा प्रवास अधिक सुरक्षित राहतो.
हेही वाचा - Crime News : अमेरिकेत तेलंगणातील युवकाचा मृत्यू; कुटुंबीयांची सरकारकडे मदतीची मागणी
दोन दिवसांची दौऱ्याची ठळक वैशिष्ट्ये
डोनाल्ड ट्रम्प आणि मेलानिया ट्रम्प हे दोन दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर होते. या काळात त्यांनी विंडसर कॅसलला भेट देत ब्रिटनचे राजा-राणी यांची भेट घेतली. तसेच, चेकर्स येथे ब्रिटिश पंतप्रधानांसोबत महत्त्वपूर्ण राजनैतिक चर्चा झाली. दौऱ्याच्या शेवटी तांत्रिक अडचणींमुळे आपत्कालीन लँडिंग घडले असले तरी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सुरक्षितरीत्या अमेरिकेला रवाना झाले.