ह्यूस्टन: अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ग्वाडालुपे नदीत आलेल्या अचानक पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये या महापुरामुळे 80 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 41 जण बेपत्ता असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. संपूर्ण टेक्सास राज्यात अनेक भागांत पावसाने हाहाकार माजवला असून, हवामान खात्याने आणखी पुराचा इशारा दिला आहे.
ग्वाडालुपे नदीच्या काठावर असणाऱ्या भागांमध्ये पूर पाण्याचे प्रमाण झपाट्याने वाढल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. टेक्सासमधील सॅन अँटोनियो शहरात शुक्रवारी 15 इंच म्हणजेच जवळपास 38 सेंटीमीटर पाऊस पडला. फक्त 45 मिनिटांत नदीची पातळी तब्बल 26 फूट म्हणजे 8 मीटरने वाढली आणि त्यामुळे अनेक घरे, दुकाने व वाहने पुराच्या पाण्यात वाहून गेली.
हेही वाचा: Gold Rate Today: सोन्याच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या तुमच्या शहरातील 10 ग्रॅमची किंमत
या महापुरामुळे अनेक कुटुंबांचे जगणे उद्ध्वस्त झाले आहे. पुरामध्ये मुलींसाठी आयोजित करण्यात आलेले एक उन्हाळी शिबिर अडकले होते. सुदैवाने, शिबिरात सहभागी असलेल्या 750 मुलींना वाचवण्यात यश आले. मात्र इतर भागांतील बचावकार्य अजूनही सुरूच आहे.
बचाव आणि शोध मोहीमेसाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. आपत्कालीन यंत्रणांनी नागरिकांना आवश्यक त्या सर्व मदतीसाठी सज्ज ठेवले आहे. स्थानिक प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे, अन्न व औषधांचा पुरवठा करीत आहेत.
हवामान विभागाने पुढील काही दिवसांमध्ये पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना त्वरित सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत.