अंबरनाथ: लिफ्टचा दरवाजा बंद केल्यामुळे सोसायटीतील एका रहिवाशाने 12 वर्षीय मुलावर अमानुष मारहाण केल्याची घटना पालेगाव भागातील एका सोसायटीत घडली. हा धक्कादायक प्रकार लिफ्टमध्ये असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाली असून, आरोपीविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव कैलास तनवाणी आहे.
हेही वाचा: कोण आहे त्रापित बन्सल? मेटानं दिलं तब्बल 854 कोटींचं पॅकेज
नेमकं घडलं तरी काय?
अंबरनाथ पूर्वेच्या पालेगाव परिसरात पटेल झिओन नावाची सोसायटी आहे. इमारतीच्या 14 व्या मजल्यावर राहणारा त्यागी पांडे ट्युशनसाठी घराबाहेर पडला होता. अल्पवयीन त्यागी लिफ्टने खाली जातच होता एवढ्यात लिफ्ट 9 व्या मजल्यावर थांबली. समोर कोणीच दिसत नसल्याने त्यागीने दरवाजा बंद करण्यासाठी बटण दाबला. तेव्हा 9 व्या मजल्यावर राहणारा आरोपी कैलाश थावानी अचानक लिफ्टमध्ये आला आणि 'आपल्याला पाहून लिफ्ट बंद केला', असं गैरसमज करत आरोपी कैलास तनवाणीने अल्पवयीन त्यागीला मारहाण करण्यास सुरुवात केली. एवढंच नाही तर रागाच्या भरात आरोपीने अल्पवयीन त्यागीच्या हातावर जोरात चावा घेतला. यानंतर, ग्राउंड फ्लोअर येईपर्यंत आरोपी कैलास पीडित अल्पवयीन त्यागीला मारतच राहिला. लिफ्टमधून बाहेर आल्यानंतरही मारहाणीचा सिलसिला सुरूच होता.
तेव्हा सुरक्षा रक्षक आणि काही रहिवाशांनी प्रसंगावधान राखून त्यागीला वाचवले आणि घरी पाठवले. मारहाण करताना आरोपी कैलासच्या हातात चावी आणि मोबाईल असल्याने पीडित अल्पवयीन मुलाला अंतर्गत दुखापत झाली. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना लिफ्टमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी पीडित मुलाच्या पालकांनी केली आहे.