शहापूर: शहापूर तालुक्यातील किन्हवली जवळील अस्नोली गावातील तळेपाडा इथे मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. जन्मदात्या आईनेचं पोटच्या तीन मुलींना जेवणातून विष देत जीव घेतलायं. या आईला किन्हवली पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास अटक केलीयं. काव्या (10), दिव्या (8) आणि गार्गी भेरे (5) अशी मृत पावलेल्या मुलींची नावे आहेत. हत्या केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत संध्या संदीप भेरे असे अटक केलेल्या आईच नाव आहे. आईला रविवारी विशेष न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं आरोपी आईला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
शहापूर तालुक्याच्या लगत असलेल्या चेरपोली गावातील संदीप भेरे यांची पत्नी संध्या ही आपल्या 3 मुलींसह मागील आठ महिन्यांपासून तिच्या माहेरी राहत होती. सोमवारी (21 जुलै) रोजी काव्या, दिव्या आणि गार्गी यांना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास सुरू झाल्यानं आईनं अस्नोली इथल्या खासगी डॉक्टरकडं त्यांना उपचारासाठी नेलं. प्रकृती चिंताजनक वाटल्याने पुढील उपचारासाठी शहापूर शहरातील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. मात्र, तिघींची प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्यानं दोघींना मुंबईच्या नायर रुग्णालयात तर, एकीला घोटीजवळील धामणगाव इथल्या एसएमबीटी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज देणाऱ्या चिमुरड्या तिघीं बहिणींवर काळानं घाला घातला.
हेही वाचा: Buldhana Crime: तरुणाला धर्म विचारुन मारहाण, मागासवर्गीयांकडून आज खामगाव बंदची हाक
मुंबई येथील नायर रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या काव्या आणि गार्गीचा मृत्यू गुरुवारी (दि. 24) रोजी रात्री झाला. तर दिव्याचा मृत्यू शुक्रवारी (दि.25) रोजी सकाळी झाला. या धक्कादायक घटनेमुळं तालुक्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शुक्रवारी किन्हवली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र या घटनेनंतर मुलींच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानं तिन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छदेन अहवालातून तिन्ही मुलींना जेवणातून कीटकनाशक दिल्याचं स्पष्ट झालं असल्याची माहिती किन्हवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी दिली.
मृत पावलेल्या तीन्ही मुलींची आई आपल्या पतीपासून विभक्त राहत होती. तिन्ही मुलींचं पालनपोषण आणि शिक्षण कसं करायचं या विचारातून तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं पोलीस तपासात समोर आलंयं. अटक केलेल्या महिलेला रविवारी विशेष न्यायालयात हजर केलं असता, विशेष न्यायालयानं तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती किन्हवली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खैरनार यांनी दिली.