जुगल पाटील. प्रतिनिधी. जळगाव: जळगाव शहरात भरदिवसा झालेल्या धक्कादायक चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. शहरातील महाबळ रस्त्यावरील अरुंधती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या एका नामवंत पत्रकाराच्या घरात दुपारी अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अर्ध्या तासाच्या गैरहजेरीत चोरट्यांनी फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला:
ही घटना गुरुवारी दुपारी अंदाजे 1 वाजल्याच्या सुमारास घडली. पब्लिक लाईव्ह या डिजिटल न्यूज पोर्टलचे संपादक काशिनाथ चव्हाण हे आपल्या कुटुंबासह या अपार्टमेंटमध्ये वास्तव्यास आहेत. दुपारच्या सुमारास त्यांच्या पत्नी आपल्या दोन्ही मुलांना घेऊन शेजारील ब्युटी पार्लरमध्ये गेल्या होत्या. अवघ्या अर्ध्या तासाच्या गैरहजेरीत चोरट्यांनी दुसऱ्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.
चोरट्यांनी लाखाच्या घरात जाणारा ऐवज लंपास केला:
घरात शिरताच चोरट्यांनी थेट कपाट गाठले आणि त्यामधून अंदाजे 7 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, 5 तोळ्यांचे चांदीचे ब्रेसलेट आणि सुमारे 85 हजार रुपयांची रोकड असा एकूण लाखाच्या घरात जाणारा ऐवज लंपास केला. विशेष म्हणजे ही घटना दुपारच्या उजेडात आणि अपार्टमेंटसारख्या वर्दळीच्या ठिकाणी घडली आहे, जे अत्यंत चिंताजनक आहे.
घरी आल्यावर चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस:
जेव्हा चव्हाण यांच्या पत्नी घरी परतल्या, तेव्हा त्यांना दरवाजा उघडा दिसला. घरात प्रवेश करताच त्यांना कपाटे उघडी दिसली आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. या घटनेनंतर, त्यांनी तात्काळ रामानंदनगर पोलीस स्थानकात संपर्क केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे आणि त्यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली.
चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू:
दरम्यान, अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत होते का? चोरट्यांनी नेमकं कोणत्या मार्गाने प्रवेश केला असावा? त्यांनी किती वेळ घरात घालवला? हे सर्व तपासाअंतर्गत येणार असल्याचे पोलीस सूत्रांकडून कळते. रामानंदनगर पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु असून, चोरट्यांचा शोध घेण्यासाठी विविध कोनातून तपास सुरु करण्यात आला आहे.
या घटनेमुळे महाबळ रस्ता परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भरदिवसा, अपार्टमेंटसारख्या सुरक्षित वाटणाऱ्या ठिकाणी चोरी होणे, हा पोलिसांसाठी मोठा आव्हानात्मक प्रश्न आहे.