Pahalgam Attack Widow : पहलगाम दहशतवादी हल्ल्यात हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीची पत्नी ऐशन्या द्विवेदी यांनी आगामी भारत-पाकिस्तान आशिया कप 2025 सामन्याला तीव्र विरोध केला आहे आणि सर्वांना या सामन्यावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. त्या म्हणाल्या की, हल्ल्यात प्राण गमावलेल्या 26 जणांच्या बलिदानाकडे दुर्लक्ष केले जात आहे आणि पाकिस्तानसारख्या दहशतवादी राष्ट्रासोबत क्रिकेट खेळणे म्हणजे शहीदांच्या कुटुंबांच्या जखमांवर मीठ चोळण्यासारखे आहे.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना त्या म्हणाल्या, "बीसीसीआयने हा सामना स्वीकारायला नको होता. आमच्या खेळाडूंना राष्ट्रवादी म्हटले जाते. परंतु, 1-2 वगळता कोणीही पुढे येऊन पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार दिला नाही. देशासाठी उभे राहणे ही त्यांची नैतिक जबाबदारी होती. पण ते तसे करत नाहीत." त्यांनी प्रश्न केला की, सामन्यातून मिळणारा महसूल कशासाठी वापरला जाईल. त्या म्हणाले, "पाकिस्तान त्या पैशाचा वापर फक्त दहशतवादासाठी करेल. मला विचारायचं आहे, प्रायोजक आणि प्रसारकांनीही विचार करावा की त्यांचा त्या 26 कुटुंबांविषयीच्या भावना, राष्ट्रवाद संपला आहे का? टीव्ही चालू करू नका, या सामन्यावर बहिष्कार घाला."
हेही वाचा - Bomb Threat at Taj Palace: दिल्लीतील ताज पॅलेस हॉटेलला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षेत वाढ
विरोधी पक्षांनी भारत-पाकिस्तान सामन्यावरून केंद्र सरकार आणि बीसीसीआयवरही निशाणा साधला आहे. शिवसेना (उबाठा) नेते आदित्य ठाकरे यांनी विचारले - "रक्त आणि क्रिकेट एकत्र वाहू शकते का?" महाराष्ट्र काँग्रेसने म्हटले आहे की, हा शहीदांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा अपमान आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केला की, सरकारने सामन्याला परवानगी देऊन आपला दुटप्पीपणा उघड केला आहे.
दुसरीकडे, सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी 14 सप्टेंबर रोजी दुबईमध्ये होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावर बंदी घालण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला.
हेही वाचा - Vaishno Devi Yatra: नवरात्रीपूर्वी भाविकांसाठी आनंदाची बातमी! 'या' दिवसापासून सुरू होणार माता वैष्णोदेवी यात्रा