ठाणे : नवरात्र आणि दसरा हा कल्याण-डोंबिवलीसाठी एक महत्त्वाचा आणि मोठा उत्सव आहे. या काळात कल्याणमधील प्रसिद्ध दुर्गामाता मंदिर आणि दुर्गाडी किल्ल्यावर दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात, ज्यामुळे शहरात मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी होते. यंदा कल्याण-डोंबिवलीत नवरात्र आणि दसरा उत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलीस सतर्क झाले आहेत.
येथील वाहतूक कोंडीची समस्या टाळण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत काही मुख्य मार्गांवरून जड वाहनांना प्रवेशबंदी केली आहे. ठाणे वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी काढलेल्या आदेशानुसार, उत्सव काळात नागरिकांना सुलभ प्रवास करता यावा यासाठी हे बदल करण्यात आले आहेत. या नियमांमुळे उत्सव काळात वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल.
हेही वाचा - Sharadiya Navratri 2025: मुंबईत नवरात्रोत्सव शांत आणि सुरक्षित पार पाडण्यासाठी पोलिस सज्ज
नवरात्रीमध्ये बंद असणारे रस्ते आणि पर्यायी मार्ग
- कल्याण नाका ते मुद्रा बायपास: नवी मुंबई, पनवेल, महापे पाईपलाईन आणि मुद्रा बायपास मार्गे कल्याण शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व जड वाहनांना बंदी आहे. या वाहनांनी मुद्रा बायपासवरून खारेगाव टोलनाका आणि मुंबई-नाशिक महामार्गाचा वापर करावा.
- खोणी निसर्ग ढाबा: तळोजा बायपासमार्गे कल्याण शहराकडे येणाऱ्या जड वाहनांना प्रवेश नाही. ही वाहने बदलापूर – अंबरनाथ – काटई बदलापूर चौक – लोढा पलावा – कल्याण फाटा या मार्गाचा वापर करावा.
- श्रीराम चौक: श्रीराम चौकातून कोळसेवाडी हद्दीत जाणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंद आहे. या वाहनांनी उल्हासनगर – शहाड – अंबरनाथ मार्गाने प्रवास करावा.
- आधारवाडी चौक: शहाड, दुर्गामाता चौक, कोनगाव मार्गे भिवंडीकडे जाणाऱ्या जड वाहनांना प्रवेशबंदी आहे. ही वाहने आधारवाडी चौक – गंधारी ब्रिज – बापगाव – सोनाळे या पर्यायी मार्गाचा वापर करू शकतात.
- रांजनोली नाका: कोनगाव मार्गे कल्याण शहरात येणाऱ्या वाहनांना प्रवेशबंदी आहे.
- नेवाळी नाका: मलग रोड आणि चक्कीनाका मार्गे कल्याण शहराकडे येणाऱ्या जड वाहनांना प्रवेश बंद आहे. या वाहनांसाठी बदलापूर – अंबरनाथ हायवे हा पर्यायी मार्ग खुला आहे.
हेही वाचा - Eknath Shinde X Account Hack : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एक्स हँडल हॅक, पाकिस्तान-तुर्कीचे झेंडे पोस्ट,नेमकं काय झालं?
नागरिकांसाठी आवाहन
पोलीस प्रशासनाने सर्व वाहनचालकांना आणि नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. जड वाहनांनी केवळ पर्यायी मार्गांचा वापर करावा. नागरिकांनीही या बदलांची नोंद घेऊन प्रवासाचे नियोजन करावे, जेणेकरून सर्वांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे,