Thursday, September 18, 2025 06:52:05 PM

Buldhana Accident : बुलढाण्यात कार-ट्रेलरची भीषण धडक; चौघांचा जागीच मृत्यू, पाच जखमी

buldhana accident  बुलढाण्यात कार-ट्रेलरची भीषण धडक चौघांचा जागीच मृत्यू पाच जखमी

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरजवळील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघाताने  धक्का बसला आहे. मारुती ईको कारने भरधाव वेगाने जाताना ट्रेलरला मागून जोरदार धडक दिल्याने वाहनाचा अक्षरशः चक्काचूर झाला. या दुर्घटनेत तिघी महिलांसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून पाच प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये कार चालक साजिद अजीज बागवान यांचा समावेश आहे.

हा अपघात रात्री सुमारे 11:40 च्या सुमारास घडला. कारमधील प्रवासी वेगाने प्रवास करत असताना अचानक नियंत्रण सुटले आणि वाहन ट्रेलरला धडकले. धडक इतकी जबरदस्त होती की कारचे अवशेष विखुरले गेले. मृतांमध्ये तिन्ही महिला घटनास्थळीच ठार झाल्या. तर संतोष तेजराव महाले (जळगाव), पंकज दिलीप गोपाळ, दीपिका विश्वास (प. बंगाल) आणि टीना अजय पाटील (भुसावळ) यांसारखे प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींना पुढील उपचारासाठी इतर ठिकाणी हलवण्यात आले आहे.

हेही वाचा - Malegaon Blast Case: मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील 7 निर्दोष सुटलेल्या आरोपींना हायकोर्टाची नोटीस; 6 आठवड्यांत द्यावे लागणार उत्तर 

या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले तसेच जखमींना उपचारासाठी तातडीने दाखल केले. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. वारंवार होणाऱ्या महामार्गावरील अपघातांमुळे वेग मर्यादा पाळण्याचे तसेच रात्रीच्या प्रवासात सतर्क राहण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.


सम्बन्धित सामग्री