पैठण: पावसाळा लागून दीड महिना उलटला तरीदेखील अद्यापही मराठवाड्यात पावसाने हजेरी लावली नाही. त्यामुळे सर्वत्र दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईमुळे पशुधनाच्या विक्रीत वाढ झाली असून, याचा प्रत्यय रविवारी मराठवाड्यातील दोन नंबरची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचोड (ता. पैठण) येथील भरलेल्या बैलबाजारात आला आहे. सध्या जनावरांना चारा व पाण्याची टंचाई भासत असल्यामुळे जनावरे विकण्यासाठी आलेल्यांची मोठी गर्दी दिसत होती, मात्र खरेदीदार फिरकत नव्हते. यामुळे जनावरांचे दरही घटले असून, याचा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे.पाचोड येथील बैलबाजार मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. दर रविवारी येथे बैलबाजार भरतो. गत आठवड्यातील बैलबाजारात कधी नव्हे एवढी जनावरांची संख्या दिसून आली. यातही सर्वाधिक जनावरे शेतकऱ्यांची असल्याचे सांगण्यात आले. पैठण तालुक्यात गत महिन्यापासून भीषण टंचाई आहे. या परिस्थितीने शेतकऱ्यांसोबत पशुपालकही त्रस्त झाले आहेत. आता तर गावागावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. नदी-नाले कोरडे पडले असून, विहिरीत पाण्याचा थेंबही नाही.
हेही वाचा: हल्ली कुणीही रमी खेळतं; माणिकराव कोकाटेंच्या व्हिडिओवर मंत्री सरनाईकांची पाठराखण
रिमझिम पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी तुर, कपाशी, सोयाबीन, मका, बाजरी, मुग यांसारख्या पिकांची लागवड केली. परंतु पावसा अभावी ती पिकेदेखील सुकून चालली आहेत. काही ठिकाणी माणसांना पाणी मिळत नाही, मग जनावरांचे काय, असा प्रश्न आहे.
जनावरांचे हाल डोळ्यांनी पाहावत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी आता जनावरे विक्रीस काढली आहेत. त्यामुळेच रविवारच्या बैलबाजारात मोठ्या प्रमाणात गायी, म्हशी, बैल आदी जनावरे विक्रीसाठी आली होती.
बाजारात विक्रेत्यांची संख्या अधिक असली, तरी खरेदीदार मात्र अत्यल्प आहेत. परिणामी, जनावरांचे दरही कमी झाले आहेत. ग्राहक मिळत नसल्याने शेतकऱ्याला गावावरून बाजारापर्यंत जनावरे आणण्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास डोळ्यादेखत जनावरे मरताना पाहण्याची वेळ येऊ शकते.
80 हजारांची बैलजोडी 55 हजारात
पाचोडच्या बैलबाजारात जनावरांचे भाव घसरले आहेत. त्यामागचे कारण म्हणजे ग्राहक मोजके आणि विक्रेते अधिक, अशी परिस्थिती आहे.