मुंबई: एकनाथ शिंदे यांचा स्वभाव संवेदनशील असल्याचे नेहमीच पाहायला मिळत आहे. याचीच प्रचिती आमदार संतोष बांगर यांना आली आहे. आमदार संतोष बांगर यांच्या आई वत्सलाबाई यांना हृदयात तीन ब्लॉकेज असल्याचे समोर आले आहे. मात्र याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळताच त्यांनी हिंगोलीत एअर अॅम्ब्युलन्स पाठवत संतोष बांगर यांच्या आईंना मुंबईत आणण्याची व्यवस्था केली. संतोष बांगर यांच्या आईंवर मुंबईत उपचार करण्यात आले.
शनिवारी रात्री हिंगोली जिल्ह्यात वत्सलाबाई बांगर यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. प्राथमिक उपचारादरम्यान हृदयात तीन ब्लॉकेजेस असल्याचे समोर आले. स्थानिक डॉक्टरांनी वत्सलाबाईंची स्थिती लक्षात घेत त्यांना तातडीने मुंबईत हलवण्यास सांगितले. परंतु रस्त्याने प्रवास करणे खडतर असल्याच्या कारणामुळे आमदार बांगर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला.
हेही वाचा: BJP On Supriya Sule: "नास्तिक चेहरा दाखवणे हा सुप्रिया ताईला पित्याचा वारसा", सुळेंच्या मांसाहाराच्या वक्तव्यावर भाजपाची जोरदार टीका
शिंदेंनी बांगर यांच्या आईसाठी एअर अॅम्ब्युलन्स पाठवली
आमदार संतोष बांगर यांचा फोन जाताच, एकनाथ शिंदे यांनी त्वरित नांदेड येथे खासगी एअर अॅम्ब्युलन्स पाठवली. वत्सलाबाई यांना एअर अॅम्ब्युलन्सद्वारे मुंबईतील लिलावती रुग्णालयात हलवण्यात आले. विशेषत: एकनाथ शिंदेंनी स्वत: मुंबई विमानतळावर हजर राहून वत्सलाबाई यांची विचारपूस केली आणि त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली.
आमदार बांगर यांची भावनिक पोस्ट
या प्रसंगानंतर आमदार बांगर भावूक झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यांनी एक्स पोस्ट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. "माझ्या आईला तीन ब्लॉकेजेस निघाले. तातडीने पुढील उपचारासाठी मुंबईला जाण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एअर अॅम्ब्युलन्स पाठवली. स्वतः विमानतळावर येऊन आईच्या तब्येतीची विचारपूस करून धीर दिला.मनापासून धन्यवाद साहेब." अशा आशयाची पोस्ट शिंदे यांनी केली आहे.