कराड : काँग्रेस हा हिंदूविरोधी पक्ष आहे. काँग्रेसच्या काळात हिंदूंच्या मिरवणुकीवर दगडफेक व्हायची. अनेक हिंदू विरोधी निर्णय व्हायचे. मोगलांनी भारतावर हल्ला केला. या उलट छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी इथल्या माणसांच संरक्षण केलं. इथल्या लोकांच्या भल्यासाठी काम केलं. पण काँग्रेसची सत्ता असताना जिकडे तिकडे आक्रमकांनाच महत्त्व दिले गेले. त्यांच्याच नावांचा उदो उदो झाल्याची टीका उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कराड येथे प्रचारसभेत केली.
आग्रा येथे संग्रहालयाला आक्रमकाचे नाव होते. ते नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज केल्याचेही योगी आदित्यनाथ म्हणाले. आमची श्रद्धा छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्याशी आहे; असे त्यांनी सांगितले. राज्यात बुधवार २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी बंटेंगे तो कटेंगे अशी घोषणा दिली आहे. तर पंतप्रधान मोदींनी एक है तो सेफ अशी घोषणा दिली आहे.
ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत 'एक ऐसा व्होट जिहाद करो... जिसके सिपेसालार है : शरद पवार.. अझीम सिफाही है : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले और हमारा निशाना महाराष्ट्र नही...तो दिल्ली है...' असे नोमानी बोलताना दिसत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत आलेल्या या व्हिडीओमुळे पुन्हा एकदा व्होट जिहाद, कटेंगे तो बटेंगे, एक है तो सैफ है... याची चर्चा सुरू झाली आहे.