सोलापूर: शहरातील विजापूर रोड परिसर, छत्रपती संभाजी महाराज तलाव आणि श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या चार दिवसांत तब्बल २२ कावळ्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. हे मृत्यू बर्ड फ्लू, व्हायरल इन्फेक्शन, फूड पॉयझनिंग, की उष्माघाताने झाले, याचा शोध घेतला जात आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
पक्षीप्रेमी आणि अभ्यासक चिंतेत
6 ते 8 मार्च दरम्यान एकाच परिसरात मोठ्या प्रमाणावर कावळे मृतावस्थेत आढळल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तलाव परिसर हा विविध पक्ष्यांचा अधिवास असल्याने इतर पक्ष्यांवरही धोका तर नाही ना? अशीही शंका व्यक्त केली जात आहे.
शवविच्छेदनातून काय समोर आले?
6 मार्चला मृत कावळ्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात यकृतावर परिणाम आणि उष्णतेमुळे तणाव निर्माण झाल्याचे दिसून आले. मात्र, 8 मार्च रोजी मृत झालेल्या कावळ्यांचे नमुने भोपाळ येथील प्रयोगशाळेत पाठवले जाणार असून, अहवालानंतरच नेमकी माहिती मिळेल.
तज्ज्ञ काय म्हणतात?
▪ “हा प्रश्न फक्त कावळ्यांचा नाही, तर इतर पक्ष्यांचाही आहे. अशा घटनांचे स्वरूप लक्षात घेणे गरजेचे आहे.” – भरत छेडा, मानद वन्यजीव रक्षक.
▪ “या घटनांचे मूळ कारण शोधण्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.” – मुकुंद शेटे, पक्षी अभ्यासक.
▪ “फक्त कावळे मृत्युमुखी पडले आहेत, इतर पक्ष्यांवर परिणाम नाही. भोपाळ प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच खरे कारण स्पष्ट होईल.” – डॉ. भास्कर पराडे, सहायक आयुक्त पशुसंवर्धन.
प्रशासनाने जिल्ह्यातील तलाव आणि धरण परिसरातील पक्ष्यांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनीही मृत पक्षी आढळल्यास त्वरित पशुसंवर्धन विभागाला कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.कावळ्यांच्या या गूढ मृत्यूमागचे रहस्य नेमके काय? बर्ड फ्लूचा धोका आहे का? की वाढत्या उष्णतेमुळे पक्ष्यांचा जीव जात आहे? याचे उत्तर प्रयोगशाळेच्या अहवालानंतरच मिळणार आहे.